महाराष्ट्रातील बदलापुरातील दोन शाळकरी मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय शिंदे हा एन्काऊंटरमध्ये मारला गेला. त्याच दिवशी उत्तर प्रदेशात सुलतानपूरमध्ये दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी अनुजप्रताप सिंह यालाही पोलिसांनी चकमकीत ठार केले.
दोघा आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केल्याने स्वसंरक्षणार्थ केलेल्या हल्ल्यात आरोपींचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर अलीकडच्या काळातील एन्काऊंटरच्या कारवाईवर टाकलेला थोडक्यात प्रकाशझोत...
भारतात सर्वात पहिला एन्काऊंटर ब्रिटिश राजवटीत झाला होता. १९२२ साली रंपा चळवळीतील नायक अल्लुरी सीताराम राजू यांचा इंग्रजांनी एन्काऊंटर केला होता. तत्कालीन मद्रास संस्थानमधील ब्रिटिश राजवटीविरोधात आंध्र प्रदेशातून ही चळवळ राजू यांनी सुरू केली होती.
१९६० नंतर तेलंगणाची मागणी जोर धरू लागली होती. आंध्र प्रदेशातून स्वतंत्र तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये तीन हजार आंदोलकांचा पोलिस चकमकीत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात ७ वर्षांत या राज्यात अनेकजणांचा पोलिस चकमकींत मृत्यू झाल्याचा दावा काही वृत्तवाहिन्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशात प्रत्येक १३ दिवसांमागे एक एन्काऊंटर होत असल्याचा दावा माध्यमांनी केला आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अहवालानुसार, देशात ६ वर्षांत ८१३ जणांचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला आहे. २०१६ ते २०२२ या काळात देशात तीन दिवसांमागे एकजण पोलिस चकमकीत ठार झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
२० व्या शतकामध्ये मुंबई, चेन्नई, कोलकाता, गाझियाबाद या शहरांत मोठ्या प्रमाणात एन्काऊंटर झाल्याची नोंद आहे. अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि बेकायदा शस्त्रपुरवठाप्रकरणी पोलिसांनी नामचीन गुंडांना एन्काऊंटरमध्ये ठार केल्याचे सांगण्यात येते. २००२ ते २०१३ या काळात देशात अनेक ठिकाणी बनावट चकमकी झाल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने म्हटले आहे.
प्रलंबित खटल्यातील आरोर्पीचा एन्काऊंटर करण्याच्या प्रमाणात २०१६ ते २०२४ या काळात पाच पर्टीनी वाढ झाल्याची माहिती तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली होती. अशा खटल्यातील चकमकींची संख्या २५ वरून १२४ झाल्याचे त्यांनी सांगितले.
२००२ ते २०२३ या कालावधीत देशात एक हजारहून अधिक बनावट चकमकी करण्यात आल्याचा दावा मानवाधिकार संघटनेने केला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशात २३१, राजस्थानात ३३. तर महाराष्ट्रात ३१, दिल्ली २६, आंध्र प्रदेश २२ आदी राज्यांतील बनावट चकमकींचा समावेश आहे.