शुक्रवारपासून ९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

Marathi Sahitya Sammelan : मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच संमेलन नवी दिल्‍ली येथे
Marathi Sahitya Sammelan
नवी दिल्‍ली येथील तालकटोरा स्‍टेडियम. याठिकाणीच शुक्रवारपासून अ.भा. मराठी साहित्‍य संमेलनाला सुरवात होत आहे. Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षा आहेत तर ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच संमेलन आहे आणि राजधानी दिल्लीत हे संमेलन होत आहे. सरहद, पुणे या संस्थेच्या वतीने संमेलनाचे आयोजन केले जात आहे. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत म्हणजेच तालकटोरा स्टेडियममध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या निमित्ताने ३ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामध्ये कविता, पुस्तक प्रकाशन, चर्चा, परिसंवाद, मुलाखती असे एकाहून एक कार्यक्रम होणार आहेत.

विज्ञान भवनात उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीतील विज्ञान भवनात आज (शुक्रवारी) दुपारी ३.३० ला साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उर्वरित सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीमध्ये म्हणजेच तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहेत. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.

छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी संमेलनासाठी सज्ज

दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमला मराठ्यांच्या इतिहासात आगळेवेगळे महत्त्व आहे. दिल्ली काबीज करत असताना मराठ्यांनी तालकटोरा याठिकाणी काही काळ मुक्काम ठोकला होता. या ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे. मागील ३ महिने या संमेलनाची तयारी सुरू आहे . जवळपास २००० आसन व्यवस्था याठिकाणी आहे.

लोकशाहीच्या मंदिरातून साहित्याच्या मंदिराकडे ग्रंथदिंडी

यंदाच्या साहित्य संमलेनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथदिंडीची सुरुवात देशाच्या संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्‍यापर्ण करून होणार आहे. 'लोकशाहीच्या मंदिरातून साहित्याच्या मंदिराकडे' असा प्रवास ही ग्रंथदिंडी करणार आहे. या ग्रंथदिंडीत सर्व साहित्यिक पायी चालणार आहेत. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील, असेही संजय नहार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news