

नवी दिल्ली : प्रशांत वाघाये
राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीत राहणाऱ्या मराठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. संमेलनाच्या समारोपाच्या तिसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दिल्लीकर मराठी नागरिकांची गर्दी साहित्य संमेलन स्थळी दिसून आली.
राजधानी दिल्लीत अधून मधून मराठी कार्यक्रम किंवा उपक्रम होत असतात. मात्र साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच तीन दिवस मराठी कार्यक्रमांची मोठी रेलचेल होती. यामध्ये कवी कट्टा, विविध पुस्तकांचे प्रकाशन, ग्रंथनगरी, परिसंवाद, प्रकट मुलाखती असे कार्यक्रम होते. साहित्य संमलेनाला भेट दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकील असलेल्या सुवर्णा दामले गाणू म्हणाल्या की, दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही कौतुकाची गोष्ट आहे. दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांसाठी विशेषत्वाने लहान मुलांसाठी ही पर्वणी आहे. विविध चांगले परिसंवाद संमेलनात होते. 'आम्ही असे घडलो' हे सत्र ऐकता आलं, उत्तम होतं, असेही त्या म्हणाल्या. तर आयएएस दिल्ली इंस्टिट्यूटचे संचालक आदेश मुळे म्हणाले की, दिल्लीमध्ये आयोजित केलेले मराठी साहित्य संमेलन आम्हा दिल्लीस्थित मराठी परिवारांसाठी ऐतिहासिक आहे आणि एक पर्वणी ठरले आहे. अनेक नामवंत मराठी साहित्यिक, पत्रकार यांना प्रत्यक्ष भेटता आले, ऐकता आले, संवाद साधता आला, त्यांच्या सोबत भेटता आले, आमच्यासाठी हे संमेलन अविस्मरणीय आहे. ग्रंथ नगरीतील मराठी साहित्य संपदा नजरेखालून घालायला ३ दिवस अगदीच तोकडे पडले, असेही ते म्हणाले.
मराठी साहित्य संमेलनामध्ये उपस्थितीबद्दल अनेकदा चर्चा होते. दिल्लीत झालेले मराठी साहित्य संमेलन मात्र लोकांच्या उपस्थितीने चांगलेच गाजले. या संमेलनात महाराष्ट्रातून तर मराठी लोक आली होतीच मात्र दिल्लीत राहणाऱ्या अनेक लोकांनीही संमेलनाला हजेरी लावली. तसेच दिल्लीच्या अवतीभोवती आणि लगतच्या राज्यात राहणारे मराठी लोक, कर्नाटक, गोवा आणि अन्य राज्यांमध्ये राहणाऱ्या मराठी लोकांनीही साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थिती लावली. या निमित्ताने देशभरातील मराठी माणूस एकत्र आल्याचे पहायला मिळाले.