उद्याच्या भारतासाठी…

उद्याच्या भारतासाठी…

एन. आर. नारायण मूर्ती
'इन्फोसिस'चे संस्थापक

दारिद्य्र, अनारोग्य आणि कुपोषणमुक्त भारत उभा करायचा असेल, तर त्यासाठी आपला देश आधी इच्छा, शिस्त, योग्य मूल्ये, कष्ट आणि त्याग यांच्याद्वारे एक आर्थिक ताकद म्हणून उदयास यायला हवा. ज्यावेळी भारत विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात नैतिक नेतृत्व करू लागेल आणि इथे जेव्हा चांगले आणि न्याय्य प्रशासन, प्रामाणिकपणा आणि गुणांचा गौरव होईल तेव्हाच हे घडेल.

आपल्या देशात आज ज्या समस्या भेडसावत आहेत, त्या सोडविण्यासाठी मूलभूत संशोधनाची गरज असल्याचे स्पष्टतेने जाणवते. यासाठी या देशातील तरुणाईला असे संशोधन करण्यासाठी प्रोत्साहित करायला हवे. त्यांना तशी साधनसामग्री उपलब्ध करून द्यायला हवी. त्यातूनच आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या अनेक गंभीर समस्यांवरचे तोडगे आपल्याला मिळतील. भारतात नागरिकांच्या समस्या इतर देशांच्या तुलनेत कदाचित अधिक आहेत. एक तर आपली प्रचंड लोकसंख्या हे आपल्या मुलांना अगदी प्राथमिक शिक्षण, आरोग्य सुविधा, पोषण आणि निवारा पुरवण्याच्या द़ृष्टीने खूप मोठे आव्हान आहे. आणि यावर उपाय शोधण्यासाठीच तरुणांनी मूलभूत संशोधनाकडे वळणे आवश्यक आहे.

हे कसे करायचे? मला वाटते, आपल्या समस्यांवर शास्त्रीय आणि तंत्रज्ञानावर आधारित तोडगे काढण्यासाठी संशोधनाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर कसा करायचा याबाबत स्वतंत्रपणे विचार तरुणांना करता यावा असे शिक्षण आपण त्यांना दिले पाहिजे. त्यासाठी आपल्या देशात मुलांना प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे आणि त्याचबरोबर त्यांच्या कल्पनाशक्तीलाही भरारी मिळेल असे वातावरण तयार व्हायला हवे. आपल्या उच्च शिक्षण आणि संशोधन संस्थांचे पोर्टल म्हणून ते प्रवेश करतात. ही मुले बुद्धिमान, चौकस, उत्साही आणि ऊर्जा असलेली तरुण-तरुणी म्हणून या संस्थांमध्ये येतात. संस्था सोडताना ते आत्मविश्वासाने परिपूर्ण, ज्ञानी, धाडसी, खुल्या मनाचे आणि स्वतंत्र विचारांचे बुद्धिवंत होतील; जेणेकरून आपल्या देशाच्या समस्यांवर उपाय शोधण्याच्या मागे लागतील, यादृष्टीने त्यांना विकसित केले पाहिजे.

एखादा युवक भारतीय संशोधन संस्थेतच शिकेल आणि तेथेच काम करेल, क्वांटम सिद्धांतासारखा शोध लावेल अशी अपेक्षा आपण करू शकतो का? आपल्या तरुणांपैकी कुणी आयरिश तत्त्वज्ञ जॉन बेल यांच्याप्रमाणे विज्ञानात योगदान देईल आणि ज्याच्या प्रयोगामुळे नील बोर आणि क्वांटम मेकॅनिक्सचे गणित हे बरोबर आहे, आणि अल्बर्ट आईन्स्टाईन चुकीचा आहे हे सिद्ध झाले त्या जॉन क्लॉसरसारखा विद्यार्थ्यासारखा विद्यार्थी बनू शकेल का? सी. व्ही. रमण, अशोक सेन आणि सत्येंद्रनाथ बोस यांच्यासारखे शास्त्रज्ञ भारतात ़होऊ शकतात का? आमचे तरुण पूर्णपणे भारतात शिकत आहेत आणि इथेच संशोधन करून एस. चंद्रशेखर, हरगोविंद खुराणा, वेंकी रामकृष्णन, अमर्त्य सेन, अभिजित बॅनर्जी, अक्षय वेंकटेश आणि मंजुळ भार्गव यांचे अनुकरण करतील असे कधी दिसेल?

भारतीय आयटी क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आहे; पण आपल्या भावी आयटी तज्ज्ञांनी प्रतिक्रियात्मक समस्या निवारक म्हणून काम करण्यापेक्षा आयटी उद्योगाने आपल्या सेवा या उत्पादन म्हणून पाहिल्या पाहिजेत. यासाठीच नव्या शैक्षणिक धोरणाविषयी मला आशा वाटते आणि यामुळे देशातील शैक्षणिक व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल असे वाटते. आपल्याला आपली मुले ही प्रतिक्रियात्मक लोक बनवायचे नाहीयेत, तर ती आपणहून सक्रिय होऊन समस्या निवारक बनायला हवी आहेत.

चांगले शिक्षण म्हणजे काय, तर जे शिक्षण मुलांमध्ये शिकण्याची, आपल्याभोवतीचे वातावरण समजून घेण्याची आणि मानवी मनाचा वापर करून घेण्याची क्षमता निर्माण करते ते चांगले शिक्षण. नव्या शैक्षणिक धोरणात यावर भर दिलेला दिसतो; पण आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे ते म्हणजे मुलांमध्ये समस्या निवारण आणि प्रश्न विचारण्याचे कौशल्य कुटुंबांमध्येच संस्कृती म्हणून विकसित करणे.

आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चौकसपणा आणि प्रश्न विचारण्याचे कौशल्य हे शाळा आणि घर दोन्ही ठिकाणी विकसित करण्याची गरज आहे. हा मानसिकतेतील बदल जोपर्यंत आपण करत नाही, तोपर्यंत कोणतेही शैक्षणिक धोरण उपयोगी पडेल असे मला वाटत नाही.

आपल्याकडे सर्वोत्कृष्ट शिक्षक होते- ते आदर्श होते, दयाळू होते, पण तितकेच कडक होते, खूप कडक. विद्यार्थ्यांनी केलेली छोटीशी चूकही त्यांना खपत नसे. त्यांनी खर्‍या अर्थाने जीवनमूल्ये जपली होती. शिक्षणाबाबत बोलायचे झाले तर मी म्हणेन की, शिक्षण हे शिकण्यासाठी असते. विद्यार्थी शाळेच्या वर्गात असतो तेव्हा आपण विषय शिकत असतो; पण या प्रक्रियेत तो तर्कशुद्ध विचार करण्याची, चौकसपणा, प्रश्न विचारण्याची प्रक्रियाही शिकत असतो. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष जगाच्या व्यवहारात पाऊल टाकता तेव्हाही तुमची शिकण्याची प्रक्रिया थांबत नाही आणि हे शिकायचे कसे हे उच्च शिक्षण तुम्हाला शिकवते.

उच्च शिक्षणामुळे तुम्ही अनेकतावादी होता आणि इतरांचे विचार ऐकून घेण्याची सहनशीलता तुमच्यात येते. उच्च शिक्षण हे मते, दृष्टिकोन याचे शिक्षण असते. तुमचे मत विरुद्ध माझे मत. माझ्या मताप्रमाणेच मी तुमच्या मताचा आदर करतो; पण मी तुमच्या मताप्रमाणे वागू शकत नाही, हा विश्वास उच्च शिक्षण देते. नजीकच्या भविष्यात भारत गरिबी, अनारोग्य आणि कुपोषण यापासून मुक्त होईल, अशी माझी आशा आहे; पण हे काम सोपे नाही.

आपण हे काम जबाबदारी म्हणून स्वीकारले पाहिजे आणि कितीही अडचणी, समस्यांचे डोंगर असले तरी यशस्वी होण्यासाठी संधी या असतातच. दारिद्य्र, अनारोग्य आणि कुपोषणमुक्त भारत उभा करायचा असेल तर त्यासाठी आपला देश आधी इच्छा, शिस्त, योग्य मूल्ये, कष्ट आणि त्याग यांच्याद्वारे एक आर्थिक ताकद म्हणून उदयाला यायला हवा. ज्यावेळी भारत विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रात नैतिक नेतृत्व करू लागेल आणि इथे जेव्हा चांगले आणि न्याय्य प्रशासन, प्रामाणिकपणा आणि गुणांचा गौरव होईल तेव्हाच हे घडेल. प्रत्येक भारतीयाने आपली जात-पात, धर्म, आर्थिक स्तर विसरून जेव्हा उत्साहाने, तळमळीने, आत्मविश्वासाने आणि कटिबद्धतेने या कार्यात झोकून देऊन काम केले तरच हे शक्य होईल. असे झाले तर भविष्यकाळात परदेशातील विद्यार्थी भारतात येऊन शिक्षण घेतील.

तरुणांचे सामर्थ्य, मूल्ये, इच्छाआकांक्षा, ऊर्जा, आत्मविश्वास, निश्चय, शिस्त आणि उत्साह यावर माझा विश्वास आहे; पण त्यासाठी तुम्ही लोकांनीही कठोर आत्मपरीक्षण करायला हवे, विचार करायला हवा आणि मागील पिढ्यांनी जे केले ते करायचे नाही, हा निश्चय केला पाहिजे. आता आपण असा सुसंस्कृत समाज निर्माण करायला हवा, जिथे प्रत्येक नागरिकाला त्याचे जीवनमान सुधारण्यासाठी समान संधी मिळतील.

प्रत्येक लहान मुलाला पोषक आहार, निवारा, आरोग्यसुविधा आणि शिक्षण मिळेल आणि समाज पोकळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष कामावर लक्ष केंद्रित करेल. भारतात आपण आपल्या कुटुंबाप्रति खूप प्रेमळ आणि उदार असतो, जवळच्या मित्रांप्रतीही आपण आदर, प्रेम व्यक्त करतो. हे चांगल्या माणसांचेच द्योतक आहे. पण एक चांगला नागरिक बनण्यासाठी तुम्हाला सगळा समाज आपला मानावा लागतो. आपल्या आणि कुटुंबाच्या हितापेक्षा समाजाच्या हिताला जास्त महत्त्व द्यावे लागते.

अनोळखी लोकांना आदराने वागवावे लागते आणि सर्वसामान्यांची काळजी घ्यावी लागते; पण का कोण जाणे आपण आपल्या कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या बाहेरील लोकांप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवत नाही. म्हणूनच आपल्या इथे भ्रष्टाचार दिसून येतो. लोक त्यांची घरे स्वच्छ ठेवतात, घरातील सगळा कचरा, घाण रस्त्यावर टाकतात आणि म्हणूनच आपल्याकडे सार्वजनिक शिस्त,जबाबदारी दिसत नाही. लक्षात ठेवा हा देश तुमचा आहे.

स्थिर आणि विकसित समाज निर्माण करण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शिक्षण हे समाजात जबाबदारी घ्यायला शिकवते, गरीब लोकांविषयी जबाबदारीने, काळजीने वागायला शिकवते, समृद्ध समाज निर्माण करण्याची जबाबदारी पेलायला शिकवते. चांगली मिळकत देणार्‍या अधिकाधिक नोकर्‍या निर्माण करणे हा देशातील गरिबी दूर करण्याचा एकमेव उपाय आहे. त्यासाठी उद्योजकता विकसित व्हायला हवी. उत्पादन आणि सेवा क्षेत्रांत आपण रोजगार निर्माण करायला हवेत. त्यासाठी आपल्याला अधिकाधिक इंजिनिअर्स, वैज्ञानिक, नोकरशहा आणि राजकारणी लोकांची गरज आहे; जे उद्योजकतेला प्रोत्साहन देतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news