

वारंगल; वृत्तसंस्था : तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील तब्बल 800 वर्षे जुने काकतीयकालीन शिवमंदिर पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी इंटिग्रेटेड शाळेसाठी जागा मोकळी करण्याच्या कामादरम्यान हे मंदिर बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप होत असून, या घटनेमुळे इतिहासप्रेमी, पुरातत्त्व वास्तूतज्ज्ञ आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वारंगल जिल्ह्यातील खानापूर मंडलातील अशोकनगर परिसरात हे प्राचीन शिवमंदिर स्थित होते. हे मंदिर काकतीय राजवंशातील राजा गणपतीदेव यांच्या 13व्या शतकातील कारकिर्दीत बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसरात फेब्रुवारी 1231 मधील दुर्मीळ सात ओळींचा तेलुगू शिलालेखही आढळला होता. पुरातत्त्व आणि वारसा विभागाने 1965 मध्ये या मंदिराची अधिकृत नोंद केली होती. मंदिर ‘कोटा कट्टा’ या ऐतिहासिक मातीच्या किल्ल्याच्या परिसरात होते. हा भाग प्राचीन किल्लेबंदी आणि काकतीयकालीन वास्तूंसाठी प्रसिद्ध मानला जातो.
दरम्यान, वाढत्या संतापानंतर वारंगल जिल्हाधिकारी डॉ. सत्य शारदा आणि नरसंपेटचे आमदार डोंथी माधव रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रशासनाने मात्र जाणूनबुजून मंदिर पाडण्यात आले नाही, असा दावा केला आहे. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, 30 एकर परिसरातील झुडपे हटवताना जुना आणि मोडकळीस आलेला अवशेष आढळला होता. तसेच संबंधित रचना अधिकृत संरक्षित स्मारकांच्या यादीत नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
कारवाईची मागणी
या घटनेनंतर तेलंगणातील हक्कांसाठी काम करणारे वकील रामाराव इम्मानेनी यांनी राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर केंद्रीय संस्कृती मंत्रालय आणि पुरातत्त्व विभागाने या प्रकरणाची दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. तेलंगणा हेरिटेज कायद्याच्या कलम 30 अंतर्गत संबंधित अधिकार्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की, पुरातत्त्व विभाग आणि एंडोमेंट विभागाची अनिवार्य परवानगी न घेता हे बांधकाम सुरू करण्यात आले. तसेच राज्य सरकारने आवश्यक ‘हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी’ स्थापन करण्यातही दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मंदिराच्या पुनर्बांधणीचे आश्वासन
जनतेचा रोष शांत करण्यासाठी प्रशासनाने त्याच ठिकाणी मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे आश्वासन दिले आहे. इतिहासतज्ज्ञ, स्थापत्यविशारद (स्थपती) आणि पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने मंदिर पूर्ववत उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच या स्थळाला अधिकृत संरक्षित वारसा दर्जा देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात येणार आहे.