पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशमॅधल अनकापल्ले जिल्ह्यात आज (दि.१३) एका फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत आठ कामगारांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. या घटनेत आणखी सात जण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांपैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
राज्याच्या गृहमंत्री व्ही. अनिता यांनी सांगितले की, अनकापल्ली जिल्ह्यातील कैलासपट्टणम येथील फटाके उत्पादन कारखान्यात आज दुपारी १२:४५ च्या सुमारास स्फोट झाला. आगीत दोन महिलांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.
आंध्र प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनकापल्ले जिल्ह्यातील फटाके उत्पादन युनिटमध्ये झालेल्या स्फोटात आठ कामगारांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि राज्याच्या गृहमंत्री अनिता यांच्याशी फोनवरून बोलून घटनेची माहिती घेतली. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.तसेच अधिकाऱ्यांना घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि त्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.