

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. राजपूर-कुस्मी मार्गावरील लाडुआ गावाजवळ भरधाव वेगाने जाणारी चारचाकी तलावात पडल्याने एका मुलीसह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण कुस्मी पोलीस ठाण्याच्या लारीमा गावातील रहिवासी आहेत. सर्वजण कारमधून सूरजपूरला जात होते. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चालक मुकेश दास हा एक मुलगी, एक महिला आणि चार पुरुषांना घेऊन कुस्मीच्या लारीमा गावातून राजपूरच्या दिशेने येत होता. राजपूरला जाण्यापूर्वी लाडुआ गावाजवळ चालकाचे वेगवान कारवरील नियंत्रण सुटले.यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात जाऊन पडली.
अपघाताचा आवाज ऐकून लोक घटनास्थळी पोहोचले. यानंतर ड्रायव्हरला लोकांनी खिडकीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. गाडी पाण्यात पडल्याने कारचा मागील भाग खोल पाण्यात बुडाला. कार पाण्याने भरलेली होती आणि तिचे सर्व दरवाजे बंद झाले. त्यामुळे लोकांचा श्वास कोंडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि उत्खनन यंत्राच्या सहाय्याने चारचारी बाहेर काढली. यानंतर सर्वांना स्कॉर्पिओमधून बाहेर काढून रुग्णवाहिकेतून राजपूर आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. मृतांमध्ये आठ वर्षांची मुलगी क्रिती, महिला चंद्रावती, याशिवाय मंगल, उदय, भूपेंद्र आणि संजय यांचा समावेश आहे. चालक मुकेश दास यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अंबिकापूर येथे रेफर करण्यात आले आहे.