

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात गुरुवारी (दि.3) एका विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगौर माता उत्सवानिमित्त काही लोक विहिरीची स्वच्छता करण्यासाठी खाली उतरले होते. ही विहीर बराच काळ न वापरण्यात आल्याने आत विषारी वायू तयार झाला होता. या विषारी वायूमुळे श्वास गुदमरून आठ जण अडकले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ आणि होमगार्डच्या पथकांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवले.
यावेळी खांडवाचे जिल्हाधिकारी ऋषभ गुप्ता यांनी सांगितले की, "सर्व आठ मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत." तसेच प्रशासनाने प्रत्येक मृताच्या कुटुंबाला ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही घटनेची दखल घेत "ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. या दुःखद क्षणी मी सर्व पीडित कुटुंबीयांसोबत आहे," असे म्हणत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
ही दुर्घटना खांडवा जिल्ह्यातील छायगाव माखन परिसरातील कोंडावत गावात घडली. प्रथम एक व्यक्ती गंगौर विसर्जनाच्या तयारीसाठी विहिरीत उतरला, मात्र तो चिखलात अडकल्याने आणखी सात जण त्याला वाचवण्यासाठी उतरले. मात्र, सर्वांचा गुदमरून मृत्यू झाला. राज्य पोलीस आणि प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मृतदेह बाहेर काढण्यात आले.