Defence Force : संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी 79 हजार कोटी

केंद्र सरकारचा निर्णय; संरक्षण क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार
India defence budget
Pudhari AI Genrated Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी तब्बल 79 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत नाग क्षेपणास्त्र, अ‍ॅडव्हान्स्ड टॉर्पेडो आणि सुपर रॅपिड गन यांसारखी अत्याधुनिक आणि घातक शस्त्रे खरेदी केली जाणार असून, यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

संरक्षण अधिग्रहण परिषदेने मंजूर केलेल्या या प्रकल्पांमुळे जमिनीवर, समुद्रात आणि आकाशात भारतीय दलांची मारक क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. नाग मिसाईल सिस्टीम ही प्रणाली ट्रॅकवर चालणार्‍या वाहनांवर तैनात केली जाईल. शत्रूचे रणगाडे, बंकर्स आणि मजबूत तटबंदी उद्ध्वस्त करण्यात ही क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत प्रभावी आहे. ग्राऊंड बेस्ड मोबाईल सिस्टीम ही एक मोबाईल इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स प्रणाली आहे, जी 24 तास शत्रूच्या हालचालींवर आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नलवर नजर ठेवेल. यामुळे सीमेवरील सुरक्षा अधिक मजबूत होईल. मटेरियल हँडलिंग क्रेनसह हाय मोबिलिटी व्हेईकल ही विशेष वाहने दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये लष्कराला रसद (लॉजिस्टिक) आणि इतर साहित्य पोहोचवण्यासाठी मदत करतील, ज्यामुळे कोणत्याही परिस्थितीत लष्कराची कार्यक्षमता टिकून राहील.

समुद्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी भारतीय नौदलाला अनेक अत्याधुनिक शस्त्रे आणि प्लॅटफॉर्म मिळणार आहेत. लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स ही मोठी जहाजे समुद्रातून जमिनीवर लष्करी कारवाई करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. याशिवाय शांतता मोहीम, आपत्कालीन मदत आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातही त्यांची महत्त्वाची भूमिका असेल. अ‍ॅडव्हान्स्ड लाइटवेट टॉर्पेडो डीआरडीओच्या नौदल विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रयोगशाळेने विकसित केलेले हे टॉर्पेडो शत्रूच्या पारंपरिक, अणू आणि लहान पाणबुड्यांना अचूकपणे लक्ष्य करू शकतात. याशिवाय इलेक्ट्रो-ऑप्टिकल इन्फ्रारेड सर्च अँड ट्रॅक सिस्टीम आणि 76 मिमी सुपर रॅपिड गनसाठी स्मार्ट फायर कंट्रोल सिस्टीममुळे नौदलाची लक्ष्यभेदक क्षमता आणि अचूकता वाढेल.

भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी कोलॅबोरेटिव्ह लाँग रेंज टार्गेट सॅच्युरेशन अँड डिस्ट्रक्शन सिस्टीमला मंजुरी देण्यात आली आहे. ही एक स्वायत्त प्रणाली आहे, जी मानवरहित विमानांना टेकऑफ, लँडिंग, नेव्हिगेशन, लक्ष्य शोधणे आणि हल्ला करण्याची क्षमता देईल. यामुळे हवाई दलाची हल्ला करण्याची ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

शत्रूशी लढण्यासाठी प्रभावी शस्त्रे

या सर्व प्रकल्पांमुळे तिन्ही सैन्य दलांच्या ताकदीत मोठी वाढ होणार आहे. लष्कराला शत्रूशी लढण्यासाठी अधिक प्रभावी शस्त्रे मिळतील, नौदल समुद्रात आपली पकड मजबूत करेल आणि हवाई दल आकाशातून शत्रूवर अधिक अचूक हल्ले करू शकेल. याशिवाय, 24 तास पाळत ठेवणार्‍या प्रणालींमुळे देशाची सुरक्षा अधिक मजबूत होईल. सरकार आणि सैन्य दले मिळून या प्रकल्पांवर वेगाने काम करतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news