Lok Sabha Election : इंडिया आघाडीचे जम्मू कश्मीरमधील सूत्र ठरले, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ३-३ जागा तर पीडीपी स्वतंत्र लढणार | पुढारी

Lok Sabha Election : इंडिया आघाडीचे जम्मू कश्मीरमधील सूत्र ठरले, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स ३-३ जागा तर पीडीपी स्वतंत्र लढणार

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीचे जम्मु कश्मीर आणि लडाखमधील जागावाटपाचे सूत्र अखेर ठरले आहे. यामध्ये एकुण ६ पैकी ३ जागा काँग्रेस लढणार आहे तर नॅशनल कॉन्फरन्स ३ जागा लढणार आहे. दरम्यान, पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती इंडिया आघाडीचा भाग असुनही त्यांचा पक्ष काश्मीरमधील सर्व जागांवर स्वतंत्र लोकसभा निवडणूक लढवेल, असे यापुर्वीच त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंजाबप्रमाणेच इंडिया आघाडीतील घटक पक्ष इथेही एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जागा वाटपाचे सूत्र ठरवण्यात आणि उमेदवार ठरवण्यात गुंतले आहेत. या सर्व घडामोडीदरम्यान इंडिया आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने जम्मु कश्मीर आणि लदाखमधील जागा वाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब केले. सोमवारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस नेत्यांसोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत यासंदर्भातील घोषणा दिल्लीत केली. यावेळी काँग्रेस नेते सलमान खुर्शिद, पवन खेडा उपस्थित होते. जम्मु कश्मीर आणि लदाखमध्ये एकुण ६ लोकसभेच्या जागा आहेत. त्यापैकी काँग्रेस ३ जागांवर लढणार आहे आणि नॅशनल कॉन्फरन्स ३ जागांवर लढणार आहे. जागावाटपानुसार काँग्रेस उधमपूर, जम्मू आणि लडाख लोकसभा जागांवर आपले उमेदवार लढवणार आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स अनंतनाग, बारामुल्ला आणि श्रीनगरमध्ये निवडणूक लढवणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जम्मु कश्मीर आणि लदाखमधील ३ जागा भाजपने तर ३ जागा नॅशनल कॉन्फरन्सने जिंकल्या होत्या.

Back to top button