बिहारचे काँग्रेस नेते पप्पु यादव बंडखोरी करण्याच्या मार्गावर; अपक्ष लढण्याच्या हालचाली | पुढारी

बिहारचे काँग्रेस नेते पप्पु यादव बंडखोरी करण्याच्या मार्गावर; अपक्ष लढण्याच्या हालचाली

नवी दिल्ली; उमेश कुमार : बिहार काँग्रेसचे नेते पप्पु यादव बंडखोरी करण्याच्या मार्गावर आहेत. पप्पु यादव हे बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारीही केली आहे. काँग्रेस मात्र त्यांना यापासून थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत नाही. प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनीही पप्पु यादव विषयावर तोंड बंद ठेवले आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठीही पप्पु यादव यांच्याकडे लक्ष देण्याच्या मनःस्थितीत नाही. पप्पु यादवांची बंडखोर वृत्ती याला कारणीभुत आहे.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे मते, राज्यात राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी आहे आणि पूर्णियाची जागा त्यांच्या ताब्यात गेली आहे. या पार्श्वभुमीवर पक्षांच्या पलीकडे जाऊन जागेसाठी दावा करण्यात काही अर्थ नाही. ते आघाडी धर्माच्या विरोधात आहे. काँग्रेस असेही गृहीत धरत आहे की, पप्पु यादव यांनी काँग्रेस मुख्यालयात येऊन आपला पक्ष जन अधिकार पार्टीचे विलीनीकरण केले परंतु आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या नाहीत. त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व मिळवण्यातही रस दाखवला नाही. त्यामुळे पप्पु यादव अधिकृतपणे काँग्रेसचे सदस्यही होऊ शकले नाहीत. काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर अधिकृत सदस्य होण्यासाठी त्यांना राज्य मुख्यालयात जावुन सदस्यता मिळवावी लागते. पण दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात झालेल्या घोषणेसह, पप्पु यादव बिहारमधील त्यांच्या जुन्या लोकसभा मतदारसंघ पूर्णिया येथे परत गेले आणि प्रचारात उतरले. पक्षाचे सदस्यत्व घेण्यात त्यांनी कोणतीही रुची दाखवली नाही. त्यामुळे ते पक्षाचे सदस्य बनले नाही. त्यांना हे देखील माहीत होते की ही जागा युतीतील भागीदाराकडे जाणार आहे. पप्पु यादव अधिकृतपणे पक्षाचे सदस्यही झाले नाहीत, असे कॉंग्रेसचे मत आहे. अशा परिस्थितीत त्यांची हकालपट्टी करण्याबाबत काहीही करण्याची गरज नाही.

मात्र, बिहारचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी सांगितले की, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या परवानगीनंतर राजदसोबत आघाडीची घोषणा करण्यात आली. पूर्णियाची जागा मित्रपक्ष असलेल्या राजदकडे गेली आहे. काँग्रेस येथे राजदच्या उमेदवाराला पाठिंबा देईल. जर पक्षाचा उमेदवार बंडखोरी करून जागा लढवत असेल तर वेळ आल्यावर पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेईल.

Back to top button