लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला आणखी एक पक्ष | पुढारी

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मदतीला आणखी एक पक्ष

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीत झारखंडमध्ये भाजपने ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (एजेएसयु) पक्षासोबत युती केली आहे. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी याबाबत माहिती दिली. सोबतच झारखंडमधील गिरिडीहची जागा एजेएसयुला देण्यात आल्याचेही सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीत आपले अपेक्षित लक्ष्य साध्य करण्यासाठी भाजप प्रत्येक राज्यात प्रत्येक जागानिहाय काळजीपूर्वक लक्ष घालत आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपने झारखंडमध्ये एजेएसयु पक्षासोबत युती केली आहे. याबाबत अधिक भाष्य करताना अरुण सिंह म्हणाले की, भाजप आणि एजेएसयु
ही युती विकसित भारत, आत्मनिर्भर भारत, सक्षम भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाला बळ देईल.” झारखंडच्या १४ पैकी सर्व १४ लोकसभा मतदारसंघात निवडणूक जिंकून युतीचे उमेदवार ४ जूनला ४०० पार करण्याचे लक्ष्य निश्चित गाठतील.
तत्पूर्वी, आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी यांनी एजेएसयुचे सुदेश महतो यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो शेअर करत मरांडी म्हणाले की, आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली. झारखंडमध्ये लोकसभेच्या १४ जागा आहेत. मागील निवडणुकीत भाजपने ११ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप – एजेएसयु युती चांगले प्रदर्शन करेल असेही ते म्हणाले.

Back to top button