केजरीवाल यांच्याविरोधात विधान केलेल्या व्यक्तीची भाजपला इलेक्टोरल बॉंडद्वारे देणगी : आपचा दावा | पुढारी

केजरीवाल यांच्याविरोधात विधान केलेल्या व्यक्तीची भाजपला इलेक्टोरल बॉंडद्वारे देणगी : आपचा दावा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात अटक झाल्यानंतर अनेक घडामोडी होत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना एक संदेश पाठवला जो त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी व्हीडीओद्वारे प्रसारित केला आहे. त्यावरून केजरीवाल यांच्या पत्नी मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तर केजरीवाल यांच्या अटकेविरुद्ध आपसह इंडिया आघाडीतील पक्षांनी दिल्लीसह ठिकठिकाणी निदर्शने केली आहेत. दुसरीकडे ज्यांच्या सांगण्यावरून केजरीवाल यांना अटक केली. त्यांनी भाजपला इलेक्टोरल बॉंडद्वारे मोठी देणगी दिल्याचा दावा ‘आप’ने केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ही अटक केवळ अरबिंदो फार्माच्या शरथचंद्र रेड्डी यांच्या विधानाच्या आधारे अटक केली, त्याच रेड्डी यांना मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणात ईडीने नोव्हेंबर २०२२ मध्ये अटक केली होती. आणि रेड्डी यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला कोट्यवधी रुपयेही दिले होते, असा दावा आप नेत्या आणि दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी यांनी केला.
आतिशी म्हणाल्या की, “शरथचंद्र रेड्डी यांनी स्पष्टपणे सांगितले की ते अरविंद केजरीवाल यांच्याशी कधीही भेटले नाहीत किंवा बोलले नाहीत आणि त्यांचा आपशी काहीही संबंध नाही. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्यांनी आपले विधान बदलले,” असेही त्या म्हणाल्या. तसेच भाजपच्या खात्यात मनी ट्रेल सापडल्याचा आरोपही मंत्री आतिशी यांनी केला. “शरथचंद्र रेड्डी यांनी भाजपला ४.५ कोटींचे इलेक्टोरल बॉण्ड दिले. नंतर ५५ कोटींचे बॉन्डही दिले. हे पैसे भाजपच्या खात्यात आहेत त्यामुळे मी ईडीला आव्हान देते की त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना अटक करून दाखवावी,” असेही आतिशी म्हणाल्या.

कोण आहेत शरथचंद्र रेड्डी?

अरबिंदो फार्माचे संस्थापक पीव्ही राम प्रसाद रेड्डी यांचा मुल सरथचंद्र रेड्डी हा फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकांपैकी एक आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, रेड्डी एका कार्टेलचा भाग होते, व्यापारी आणि राजकारण्यांचा कथित ‘दक्षिण गटाचे’ सदस्य होते. बीआरएस नेत्या के कविता याही या गटाच्या सदस्या असल्याचे समजते.
दरम्यान, केजरीवालांच्या अटकेसाठी सबळ पुराव्याचा आधार असल्याचेही ईडीने न्यायालयात सांगितले होते. ईडीने केलेल्या दाव्यानुसार केजरीवाल मद्य धोरण गैरव्यवहारातील प्रमुख सूत्रधार होते. काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज केजरीवाल यांच्या अटकेविरुद्ध आपने दिल्लीतील शहीद पार्कवर निदर्शने केली. आपसह इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी दिल्लीसह काही ठिकाणी निदर्शने केली. तर दुसरीकडे भाजपने दिल्ली प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांच्या नेतृत्वाखाली आपविरुद्ध निदर्शने केली आणि केजरीवाल यांच्या अटकेची मागणी केली.
शनिवारी दुपारी केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांनी व्हिडिओ संदेशात केजरीवाल यांचा संदेश वाचून दाखवला. त्यात केजरीवाल म्हणाले की, मी आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे, भविष्यात माझ्या आयुष्यातही मोठे संघर्ष लिहिले आहेत. माझ्या अटकेमुळे भाजपचा द्वेष करू नका, असे आवाहन त्यांनी आप कार्यकर्त्यांना आहे.  केजरीवाल यांचा संदेश त्यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी वाचून दाखवल्यानंतर त्या मुख्यमंत्री होतील, अशाही चर्चा सुरू आहेत.
दुसरीकडे आपच्या मंत्री आतिशी यांनी दावा केला आहे की त्यांचे पक्ष कार्यालय सर्व बाजूंनी सील करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या कार्यालयात लोकांचा प्रवेश कसा रोखता येईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे त्या म्हणाल्या. सोबतच आपच्या एका आमदाराच्या घरी आज छापेमारी झाल्यानंतर आपने निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातही तक्रार केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर यंत्रणांच्या कारवाया होत आहेत. या कारवाया रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असेही त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Back to top button