नवी दिल्ली : ‘संविधानाचे 75 वे वर्ष सर्वांसाठी गौरवास्पद आहे. देशात अनेक प्रकल्प सुरू आहेत. वेळेत पूर्ण होणारे प्रकल्प लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकतात. आजच्याच दिवशी 1949 रोजी राजेंद्र प्रसाद यांनी केलेल्या भाषणात राष्ट्र प्रथम ही घोषणा केली होती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र यांनी केले. ते संविधान दिना निमित्त आयोजित सर्वोच्च न्यायालयातील कार्यक्रमात बोलत होते.
पीएम मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान भारताला आव्हान देणाऱ्या आतंकवादी संघटनांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा दिला. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी 26/11 हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच संविधान सभेच्या सदस्यांनाही अभिवादन केले. आपले संविधान हे आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. संविधानाने गेल्या ७५ वर्षात उभ्या राहिलेल्या विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य मार्ग दाखविला आहे. संविधानाने देशाची प्रत्येक गरज आणि अपेक्षा पूर्ण केल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, आज भारत परिवर्तनातून जात आहे. संविधानाने सर्वांना विकासाचा रस्ता दाखवला आहे. राज्यघटनेच्या रचनाकारांनी देश, काळ आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेऊन वेळोवेळी संविधानाचा अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. संविधान निर्मात्यांना हे चांगले ठाऊक होते की भारताची स्वप्ने आणि आकांक्षा काळाबरोबर नवीन उंची गाठतील आणि आव्हानांसह स्वतंत्र भारतातील लोकांच्या गरजाही विकसित होतील. त्यामुळे संविधान निर्मात्यांनी संविधान हे निव्वळ दस्तऐवज म्हणून न बनवता तो एक जिवंत, अखंड वाहणारा प्रवाह बनवला.
या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह इतर न्यायाधीश आणि मान्यवर उपस्थित होते.