पुढारी ऑनलाईन डेस्क : निवडणूक आयोगाने आज (दि. १६) लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या. या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे तो या मतदान प्रक्रियेच्या कालावधीचा. यंदाच्या लोकसभेचा कालावधी हा सर्वात प्रदिर्घ असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आज लोकसभा निवडणूकीच्या तारखा आणि प्रक्रिया याची माहिती देत असताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया ४४ दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे १९५१-५२ मधील पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतरचा सर्वात मोठा मतदान कालावधी असेल. पहिल्या निवडणुकीतील मतदान चार महिन्यांहून अधिक काळ चालले. देशातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वात कमी मतदान कालावधी 1980 मध्ये होता, जेव्हा मतदान अवघ्या चार दिवसांत पूर्ण झाले.
यावेळी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यापासून ते मतमोजणीपर्यंत एकूण 82 दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिलपासून मतदान प्रक्रिया सुरू होणार असून, सात टप्प्यांत मतदान होणार असून, 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. ही जगातील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया असेल. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पदासाठी प्रयत्नशील आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्रकार परिषदेत मतदानाच्या एवढ्या मोठ्या कालावधीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, सार्वजनिक सुट्ट्या, सण आणि परीक्षा लक्षात घेऊन निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत पार पडली, जी कालावधीच्या दृष्टीने सर्वात लांब निवडणूक होती.
सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा करताना मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार म्हणाले की, निवडणूक आयोग आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. ते म्हणाले, "मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी अवघड आव्हाने चार प्रकारची आहेत – मसल पॉवर, मनी पॉवर, चुकीची माहिती आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन."
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या मते, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटींहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. ते म्हणाले, "निवडणूक आयोग देशभरात 10.5 लाख मतदान केंद्रे स्थापन करण्याची तयारी करत आहे." यावेळी मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन नवे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधूही होते.
हेही वाचा