लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर! 43 जणांच्या यादीत 3 माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना उमेदवारी | पुढारी

लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर! 43 जणांच्या यादीत 3 माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांना उमेदवारी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसे : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने ३९ उमेदवारांच्या पहिल्या यादीनंतर ४३ उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली आहे. सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ४३ उमेदवारांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आसामचे १२, गुजरात ७, मध्यप्रदेश १०, राजस्थान १०, उत्तराखंड ३, दमन दीव १ अशा पद्धतीने ४३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या पुत्रांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, १५ मार्चला काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची तिसरी बैठक होणार आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, कोषाध्यक्ष अजय माकन आणि प्रवक्ते पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत के. सी. वेणुगोपाल यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली. आज जाहीर झालेल्या यादीत काँग्रेसने आसाममधून काँग्रेसचे तरुण नेते गौरव गोगोई यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजस्थानमधून माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

सोमवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली होती. यामध्ये ६ राज्यातील जवळपास ६२ जागांवर चर्चा करण्यात आली होती. त्यापैकी ४३ जागांवरील उमेदवारांची दुसरी यादी काँग्रेसने आज जाहीर केली. ४३ पैकी ३३ उमेदवारांचे वय हे ६० पेक्षा कमी आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत खुल्या प्रवर्गातील १०, ओबीसी १३, अनुसूचित जाती १०, अनुसूचित जमाती ९, मुस्लीम १ असे ४३ उमेदवार आहेत. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीतही सर्व समाज घटकांना स्थान दिल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी यावेळी केला.

राहुल कासवान यांना उमेदवारी

राजस्थानच्या चुरू मतदारसंघातील खासदार राहुल कासवान यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते त्या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार होते, मात्र भाजपला रामराम ठोकत ते कालच काँग्रेसमध्ये दाखल झाले. काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातून काँग्रेसने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसच्या यादीची वैशिष्ट्ये :

– ४३ पैकी ३३ जागावरील उमेदवाराचे वय हे ६० पेक्षा कमी
– आसाममधून काँग्रेसचे तरुण नेते गौरव गोगोई यांना, मध्य प्रदेशच्या छिंदवाडा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना तर राजस्थानमधून माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांना उमेदवारी
– दुसऱ्या यादीत खुल्या प्रवर्गातील १०, ओबीसी १३, अनुसूचित जाती १०, अनुसूचित जमाती ९, मुस्लीम १ असे ४३ उमेदवार

Back to top button