तामिळनाडू आणि पाँडीचेरीच्या लोकसभा जागावाटपावर काँग्रेस- द्रमुकचा अंतिम निर्णय, ९ जागा काँग्रेसला | पुढारी

तामिळनाडू आणि पाँडीचेरीच्या लोकसभा जागावाटपावर काँग्रेस- द्रमुकचा अंतिम निर्णय, ९ जागा काँग्रेसला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस आणि द्रमुकमध्ये तामिळनाडू आणि पाँडीचेरीच्या लोकसभा जागावाटपाचा अंतिम निर्णय झाला. तामिळनाडूतील ३९ जागांपैकी काँग्रेसला ९ जागा मिळाल्या आहेत. तर पाँडीचेरीमध्ये काँग्रेस एका जागेवर लढणार आहे. उर्वरित जागा द्रमुक लढणार आहे. काँग्रेसच्या वतीने आज ही घोषणा करण्यात आली.

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजले असताना इंडिया आघाडी जागा वाटपावर शिक्कामोर्तब करत आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांमधील जागावाटप जवळजवळ अंतिम झाले असतानाच तामिळनाडू आणि पाँडीचेरीमधील जागा वाटपावरही इंडिया आघाडीने यशस्वी तोडगा काढला आहे. काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शनिवारी संध्याकाळी हे जागावाटप जाहीर केले. यामध्ये तमिळनाडूतील ३९ पैकी ९ जागा काँग्रेस लढेल तर उर्वरित जागांवर प्रमुख आणि मित्र पक्षांना पाठिंबा देणार आहे. पॉंडिचेरीमधील एक जागा सुद्धा काँग्रेसच्या वतीने लढली जाणार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत द्रमुक आणि आघाडीने ३९ पैकी ३८ जागा जिंकल्या होत्या. त्यात ८ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. यावेळी द्रमुक आणि काँग्रेस एकत्र लढून सर्व ३९  जागा आम्ही जिंकू, असा विश्वास के. सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला.

जागावाटप घोषित करताना काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांवर केंद्र सरकारच्या वतीने हेतू पुरस्कर हल्ला चढवला जात आहे, असे ते म्हणाले. त्यासोबतच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील सरकारचे त्यांनी कौतुक केले आणि भाजपच्या विभाजनवादी राजकारणाशी लढा देणे महत्त्वाचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Back to top button