GDP : अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरूच; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी ८.४ टक्के | पुढारी

GDP : अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरूच; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत देशाचा जीडीपी ८.४ टक्के

पुढारी ऑनलाईन डेस्क :  भारताची आर्थिक घोडदौड वेगाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये देशाचा विकासदर (GDP) ८.४ टक्के इतका राहिली आहे. डिसेंबरच्या तिमाहितील जीडीपी हा तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजपेक्षा जास्त राहिला आहे.

ऑक्टोबर आणि डिसेंबर या तिमाहीत देशाचा जीडीपी ६.६४ टक्के राहील असा अंदाज होता, या तिमाहीत सरकारी खर्च आणि औद्योगिक उत्पादनात घट झाली होती, त्यामुळे जीडीपीही कमी राहील असा अंदाज होता. २०२३-२०२४ या संपूर्ण वर्षात जीडीपी हा ७.६ टक्के राहील, असा अंदाज आहे.

ऑक्टोबर – डिसेंबर या तिमाहीत बांधकाम क्षेत्राचा विकासदर १०.७ टक्के राहिला आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरने ८.५ टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. या दोन सेक्टरमधील सकारात्मक वाढीमुळे देशाचा जीडीपी वधारला आहे.

पंतप्रधानांनी केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीडीपीतील वाढीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, “ऑक्टोबर आणि डिसेंबरमधील तिमाहीने भारतीय अर्थव्यवस्थेची शक्ती आणि त्याची क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. विकसित भारत उभा करण्यासाठी आणि देशाच्या १४० कोटी जनतेला चांगले आयुष्य जगता येण्यासाठी अर्थव्यवस्था वेगाने वाढावी यासाठी आम्ही परिश्रम घेत आहोत.”

 

Back to top button