'चलो दिल्ली मार्च' अंतर्गत शेतकरी दिल्लीकडे कुच करण्याच्या तयारीत | पुढारी

'चलो दिल्ली मार्च' अंतर्गत शेतकरी दिल्लीकडे कुच करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ‘चलो दिल्ली मार्च’ अंतर्गत पंजाब, हरियाणा, केरळ, उत्तर प्रदेश, राजस्थानचे शेतकरी १३ फेब्रुवारीला दिल्लीकडे कुच करणार आहेत. दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने उद्या (दि. १३) पुन्हा एकदा तीन मंत्री चंदीगडमध्ये शेतकऱ्यांसोबत चर्चेला जाणार आहेत. ८ फेब्रुवारीला यापुर्वी सरकार आणि शेतकरी प्रतिनीधी यांच्यात चर्चेची पहिली फेरी झाली होती. मात्र त्या शिष्टाईला यश न आल्याने पुन्हा एकदा सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनीधीमंध्ये चर्चा होणार आहे. शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी याबाबत माहिती दिली.

केंद्र सरकारचे तीन वरीष्ठ मंत्री पियुष गोयल, अर्जुन मुंडा आणि नित्यानंद राय यांना संयुक्त किसान मोर्चाच्या आणि किसान मजदूर मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यास सांगितले होते. यानुसार ८ फेब्रुवारीला पहिली बैठक झाली होती. ही चर्चा अजूनही सुरू आहे, असे सांगितले जाते. उद्या पुन्हा एकदा तीन मंत्री चंदीगडमध्ये शेतकऱ्यांसोबत चर्चेला जाणार आहेत. मात्र शेतकरी दिल्लीकडे कूच करण्यावर ठाम असल्याचेही समजते.

संयुक्त किसान मोर्चाच्या आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वात २०० पेक्षा अधिक शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी आहेत. शेतकऱ्यांची दिल्लीकडे कुच करण्याची मोठी तयारी लक्षात घेवुन कडक सुरक्षाव्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीलगतच्या शंभू, खनौरीसह हरियाणा आणि पंजाबच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवरही सिमेंटचे मोठे बॅरिकेड्सही लावण्यात आले आहेत, मोठे लोखंडी खिळे लावण्यात आले आहेत. तसेच दिल्ली लगतच्या सर्व भागांमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला आहे दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या सीमेवरही सतर्कता वाढवण्यात आली आहे, विविध सीमा सिमेंटच्या बॅरीकेड्सने बंद केल्या जात आहेत.

रविवारी (दि. ११) सकाळपासून हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अंबाला, हिस्सार, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, फतेहाबाद आणि डबवलीसह सिरसा जिल्ह्यांमध्ये ही बंदी लागु असणार आहे असेल. तर हरियाणातील सोनीपत, झज्जर, पंचकुला, अंबाला, कैथल, हिसार, सिरसा, फतेहाबाद आणि जिंदसह १२ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. केंद्र सरकारने निमलष्करी दलाच्या काही कंपन्या हरियाणामध्ये पाठवल्या आहेत.

राजधानी दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. दिल्लीकडे कूच करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांना सीमेवर रोखण्याची सरकारची तयारी सुरू आहे. तर, दिल्लीत येऊन केंद्र सरकारला घेराव घालण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. यापासून रोखण्यासाठी हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर काटेरी तारांसह अन्य तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात बोलताना हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज म्हणाले की, राज्यातील लोकांची आणि नागरिकांची सुरक्षा करणे आमचे कर्तव्य आहे. सरकारने तीन वरिष्ठ मंत्री चंदीगडला पाठवले आहेत. ती चर्चा सुरू आहे. सरकारच्या चार प्रमुख मुद्द्यामध्ये शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकार सकारात्मक आहे. तसेच कुठल्याही प्रकारचा संघर्ष होऊ नये, हरियाणा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची प्राथमिकता आणि प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

Back to top button