नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकशाही जनतेच्या विश्वासावर चालते, त्यामुळे लोकशाही संस्थांनी त्यांच्या कार्यशैलीत आवश्यक ते बदल घडवून आणण्याची जबाबदारी लोकशाही संस्थांची आहे आणि गरज भासल्यास नियमांमध्येही सुधारणा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.
८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचा आज मुंबईत समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड, महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या परिषदेत १८ राज्यांतील २६ पीठासीन अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना विधिमंडळ संस्थांच्या सर्वोत्तम कार्यपद्धतींचा संदर्भ देत ओम बिर्ला यांनी केंद्र, राज्य आणि तळागाळातील लोकशाही संस्थांमध्ये संवाद स्थापित करण्याच्या सूचनेचे कौतुक केले. या संदर्भात त्यांनी लोकसभेने आयोजित केलेल्या पोहोच कार्यक्रमांचा संदर्भ दिला आणि राज्य विधिमंडळांनीही असे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सुचना दिल्या.
पुढे बोलताना ते म्हणाले की, विधिमंडळांना अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनवण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला पाहिजे. लोकसभेला काही राज्यांच्या विधानमंडळांकडून एक मॉडेल आयटी धोरण बनवण्यासाठी सूचना मिळाल्या आहेत. या सूचनेवर योग्य कार्यवाही केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. तंत्रज्ञानाचा मार्ग हा भविष्याचा मार्ग असून आपण लवकरात लवकर तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवले पाहिजे यावरही त्यांनी भर दिला.
विधीमंडळ हे अखंड चर्चेचे व्यासपीठ आहे. विधिमंडळामध्ये जास्त वादविवाद आणि कमी व्यत्यय असायला हवा यावर भर दिला पाहिजे. विधिमंडळात लोकांवर परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर गुणात्मक चर्चा केली पाहिजे. विधीमंडळांचा वेळ वाया जाऊ नये, तसेच सभागृहाचा वेळ वाद-विवादात लोकहितासाठी वापरता यावा, यासाठी असा कृती आराखडा व रणनीती तयार करण्याचे आवाहन त्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांना केले. सक्तीच्या आणि नियोजित स्थगितीच्या घटना आणि व्यत्ययांमुळे संसदेचा वेळ वाया जाणे ही चिंतेची बाब आहे. अशा घटनांमुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होते आणि लोकांमध्ये नकारात्मक प्रतिमा निर्माण होते, असेही ते म्हणाले.
तसेच पक्षांतर विरोधी कायद्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही ओम बिर्ला यांनी दिली. संसदेच्या पुढील अधिवेशनाच्या तयारीबाबत ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. असेही ते म्हणाले. दरम्यान, संमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल लोकसभा अध्यक्षांनी महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. तर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आभार मानले.