भारत-पाकिस्तानकडून परस्परांना आण्विक केंद्रांची यादी सुपूर्द

भारत-पाकिस्तानकडून परस्परांना आण्विक केंद्रांची यादी सुपूर्द

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : परस्परांच्या आण्विक केंद्रांवर हल्ले करू नये यासाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या कराराअंतर्गत उभय देशांनी आज (दि. १) आपापल्या आण्विक केंद्रांची यादी एकमेकांना सुपूर्द केली. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली. या करारानुसार ३२ वर्षांपासून दोन्ही देश एक जानेवारीला एकमेकांना आण्विक केंद्रांचा तपशील देत असतात.

भारताने इस्लामाबादमधील उच्चायुक्तालयाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांमार्फत पाकिस्तान सरकारला आपल्या आण्विक केंद्रांची यादी दिली. तर, पाकिस्तानतर्फे नवी दिल्लीतील उच्चायुक्तालयाच्या माध्यमातून भारत सरकारला पाकिस्तानी आण्विक केंद्रांची माहिती मिळाली. परराष्ट्र मंत्रालयाने छोटेखानी निवेदन जारी करून ही माहिती दिली. यात परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत पाकिस्तानने आज (दि. १) दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये एकाच वेळी राजनैतिक अधिकाऱ्यांमार्फत आण्विक केंद्राच्या यादीचे आदानप्रदान केले. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आण्विक केंद्रे आणि अनुषंगिक सुविधांवरील हल्ले रोखण्यासाठीच्या विशेष कराराअंतर्गत ही यादी एकमेकांना देण्यात आली. या करारावर दोन्ही देशांनी ३१ डिसेंबर १९८८ रोजी सह्या केल्या होत्या आणि २७ जानेवारी १९९१ पासून अंमलबजावणी सुरू झाली होती. पहिल्या यादीचे आदानप्रदान १ जानेवारी १९९२ रोजी झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांनी आतापर्यत ३२ वेळा यादीचे आदानप्रदान केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news