

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसद सुरक्षा भंग प्रकरणातील चार आरोपींना आज दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात सादर केले. चारही आरोपींना पोलिसांच्या मागणीनुसार आणखी पंधरा दिवसांची कोठडी कोर्टाच्या वतीने मंजूर करण्यात आली आहे.
संसद सुरक्षा भंग प्रकरणात संसदेत घुसखोरी करणारे सागर शर्मा आणि डी मनोरंजन तसेच संसदेबाहेर निदर्शने करणारे नीलम सिंह आणि अमोल शिंदे या चौघांना दिलेली सात दिवसांची कोठडी संपली. त्यांनतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आज पुन्हा चारही आरोपींना न्यायालयासमोर सादर केले. यावेळी पुन्हा एकदा न्यायालयाने या आरोपींना पुन्हा पंधरा दिवसांची कोठडी सुनावली.
दिल्ली पोलिसांच्या वतीने संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपींवर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या वतीने सुरू आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
संसद सुरक्षा भंग प्रकरणात आतापर्यंत सागर शर्मा, डी मनोरंजन, नीलम सिंह, अमोल शिंदे, ललित झा, महेश कुमावत अशा सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी सागर आणि मनोरंजनने प्रेक्षक गॅलरीतुन लोकसभेत उडी मारली होती. त्यानंतर लोकसभेत पिवळा धूर सोडणारे नळकांडे फोडले होते. अमोल आणि नीलमने संसदेबाहेर निदर्शने केली होती. तर ललित झा या सगळ्या गोष्टींचा प्रमुख सूत्रधार आहे. महेश कुमावतने ललितला मदत केली होती. त्याला राजस्थानच्या नागौरमध्ये आश्रयही महेशने दिले होते. तसेच काही मोबाईल फोनही ललित आणि महेशने मिळून जाळले होते. ललित आणि महेशला देण्यात आलेली कोठडी संपल्यानंतर त्यांनाही कोर्टासमोर सादर केले जाणार आहे.