India Allaince : इंडिया आघाडीचे जागावाटप ठरले?  | पुढारी

India Allaince : इंडिया आघाडीचे जागावाटप ठरले? 

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : येत्या १९ डिसेंबरला विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यानंतर पुढच्या १२ दिवसात म्हणजे ३१ डिसेंबरपर्यंत इंडिया आघाडीतील जागावाटप अंतिम होणार असल्याची खात्रीलायक माहिती इंडिया आघाडीतील सूत्रांनी दिली आहे. तसेच २०२४ ची लोकसभा निवडणूक विविध पक्षांनी एकत्र येऊन केलेली  आघाडी म्हणून नव्हे तर  तर एकच पक्ष किंवा संघटना असल्याप्रमाणे लढूया, असेही नियोजन इंडिया आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
२०१४ आणि २०१९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या बॅनरखाली लढली गेली. मात्र यामध्ये काँग्रेसला यश मिळाले नाही आणि दोन्ही वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता स्थापन केली. २०२४ च्या लोकसभेसाठी मात्र विरोधकांनी भाजपाला शह देण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना केली. त्यानंतर या आघाडीच्या काही बैठका देखील पार पडल्या. मात्र इंडिया आघाडीचा समन्वयक कोण असेल याच्यावर आतापर्यंत निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये इंडिया आघाडीच्या विविध समित्यांचे गठन करण्यात आले. त्यानुसार त्या समित्यांनी काम करावे, त्यासोबतच इंडिया आघाडीचे स्वतंत्र कार्यालय असावे आणि इंडिया आघाडीचे स्वतंत्र प्रवक्ते हवेत असेही काही निर्णय या बैठकांमध्ये घेण्यात आले आहेत, या सर्व निर्णयांवर ही बैठक पार पडलानंतर तातडीने अंमलबजावणी होणार असल्याची माहिती इंडिया आघाडीतील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.
इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत असताना काही ठिकाणी मात्र काँग्रेसची अडचण होण्याची शक्यता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला तेलंगणा हे एकच राज्य मिळाले. अन्य राज्यात कॉंग्रेससह मित्रपक्षांचीही कामगिरी निष्प्रभ ठरली. त्यामुळे पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या जागा वाटपामध्ये काँग्रेसचे वधारू शकणारे भाव पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विशेषतः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये काँग्रेसला कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. देशात सर्वात जास्त लोकसभा सदस्य संख्या असलेले राज्य म्हणजे उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला किमान २२ जागा हव्या आहेत तर समाजवादी पक्ष मात्र केवळ ७-८ जागा काँग्रेसला देऊ शकतो. तसेच महाराष्ट्रातही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यामुळे काँग्रेसला जास्त जागांची अपेक्षा आहे. मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार २०१९ मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणून लढलेल्या सर्व जागा लढण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे अशा काही राज्यांमध्ये वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीत आतापर्यंत प्रत्यक्ष वाद झाले नसले तरी आघाडीतील पक्षांच्या विरुद्ध, नेत्यांच्या विरुद्ध आघाडीतील नेत्यांनीच काही विधाने केली. त्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चाही रंगल्या होत्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याही वक्तव्याचा त्यात समावेश होता.
इंडिया आघाडीबद्दल भाजपला काय वाटते यावर अलीकडेच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एका मुलाखतीत बोलताना म्हणाले की, यापूर्वीही विरोधकांची आघाडी होतीच, आताही आहे. त्यांच्या आघाडीचा भाजपला काहीही फरक पडणार नाही. आम्हाला २०१४ आणि २०१९ ची निवडणूक सोपीच होती. त्याचप्रमाणे २०२४ ची निवडणूकही सोपीच असेल. पुन्हा एकदा आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनवु असा विश्वासही व्यक्त केला.

Back to top button