संसद सुरक्षा भंग प्रकरण : सहावा आरोपी महेश कुमावतलाही सात दिवसांची पोलीस कोठडी | पुढारी

संसद सुरक्षा भंग प्रकरण : सहावा आरोपी महेश कुमावतलाही सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : संसद सुरक्षा भंग प्रकरणातील नीलम सिंगसह इतर आरोपींना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले. तर, याच प्रकरणातील अटक करण्यात आलेला सहावा आरोपी महेश कुमावत याला पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर महेशलाही सात दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, आरोपी नीलमच्या पालकांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात तिच्या आणि इतरांविरुद्ध नोंदवलेल्या तक्रारीची प्रत मागण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. तसेच ती कोठडीत असण्याच्या कालावधीत तिच्याशी भेटण्याची परवानगी द्यावी, यासाठी दिल्ली पोलिसांना न्यायालयाने निर्देश देण्याची विनंतीही तिच्या पालकांनी केली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने दिल्ली पोलिसांना नोटीस जारी करत या प्रकरणाची सविस्तर सुनावणी १८ डिसेंबरला ठेवली आहे.

शनिवारी पटियाला हाऊस कोर्टाने या प्रकरणातील सहावा आरोपी महेशला सात दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. पोलिसांचा दावा आहे की, त्याला इतरांसोबत देशात अराजक माजवायचे होते. जेणेकरून ते सरकारला त्यांच्या अन्यायकारक आणि बेकायदेशीर मागण्या पूर्ण करण्यास भाग पाडू शकतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशचे इतर आरोपींसोबत गेल्या २ वर्षांपासून संबंध होते. महेश या कटाचा भाग होता. सर्व आरोपींमध्ये झालेल्या जवळपास सर्व बैठकांना तो उपस्थित राहिला होता. तसेच मुख्य आरोपी ललित झा याच्यासोबत मोबाईल फोन आणि पुरावे नष्ट करण्याच्या कृत्यातही त्याचा सक्रिय सहभाग होता.

दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलच्या वतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. रोज नवे धागेदोरे या प्रकरणात समोर येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात सहा लोकांना अटक करण्यात आली आहे तर काही लोकांची विचारपूस आणि चौकशी पोलिसांच्या वतीने सुरू आहे.

Back to top button