

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०१९ ते २०२१ या कालावधीत देशातील ३५ हजार ९५० विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. याबाबतची माहिती सामाजिक न्याय मंत्रालयाने संसदेत दिली आहे. एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांनी जातीवादामुळे जीवन संपवले आहे का? याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये १०,३३५ , २०२० मध्ये १२,५२६ आणि २०२१ मध्ये १३,०८९ विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. (Students Died)
देशात जातीवादामुळे किती विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे? याबाबतची संख्या जाहीर करावी,असे जनता दलाच्या (युनायटेड) लोकसभेतील सदस्याने म्हटले होते. जनता दलाच्या खासदारच्या या प्रश्नाला उत्तर देताना सामाजिक न्याय राज्यमंत्री नारायणस्वामी म्हणाले की, "देशातील सामाजिक भेदभावामुळे एससी, एसटी विद्यार्थ्यांनी जीवन संपवल्याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नाही". (Students Died)
सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी देशात कोणते प्रयत्न केले जात आहेत? या प्रश्नाला नारायण स्वामी यांनी उत्तर दिले आहे. नारायणस्वामी म्हणाले की, उच्च शिक्षण विभागाने समुपदेशन कक्ष आणि अनुसूचित जाती/जमाती विद्यार्थ्यांचे कक्ष, समान संधी कक्ष, विद्यार्थ्यांच्या तक्रारी अशा विविध यंत्रणा स्थापन केल्या आहेत. सेल, विद्यार्थ्यांची तक्रार समिती आणि देशभरातील शैक्षणिक संस्थांमधील संपर्क अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. (Students Died)