Assembly Election 2023 : आज निवडणुकांचा निकाल, आश्वासनांचा कस लागणार !

Assembly Election 2023 : आज निवडणुकांचा निकाल, आश्वासनांचा कस लागणार !
Published on: 
Updated on: 
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज घोषित होणार आहे. भाजप, काँग्रेससह भारत राष्ट्र समितीच्या वतीने विविध विषयांवर गॅरंटी, मोफत शिक्षण, मोफत विमा, शेतकऱ्यांना- महिलांना आर्थिक मदत, शेतीमालाला भाव, मोफत वीज, परवडणारी घरे या मुद्द्यांवर आश्वासने देण्यात आली. विविध राजकीय पक्षांच्या वतीने देण्यात आलेल्या या आश्वासनांचाही आता कस लागणार आहे. निवडणुकीच्या काळात विविध पक्षांनी दिलेली ही आश्वासने केवळ आश्वासनेच राहतात की पूर्ण होतील का हे येणारा काळ ठरवणार आहे.

कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाने कोणत्या मुद्द्यांवर प्रचार केला त्याचा हा आढावा.

राजस्थानमध्ये काँग्रेसच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे :

शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत लागू केली जाईल. चिरंजीवी विमा योजनेची रक्कम २५ लाखांहून ५० लाख करण्यात येईल. चार लाख युवकांना सरकारी नोकरी देण्यात येईल तसेच दहा लाख युवकांना रोजगार दिला जाईल. पाचशे रुपयांना असलेले गॅस सिलेंडर चारशे रुपये देण्यात येईल. पंचायत स्तरावर सरकारी नोकरीसाठी नवे कॅडर तयार करण्यात येईल.

राजस्थानमध्ये भाजपाच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे :

केजी पासून पीजी पर्यंत अभ्यासक्रम मोफत करण्यात येईल. ४५० रुपयात गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात येईल. पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्यता वाढवून १२ हजार प्रति वर्ष करण्यात येईल. लाडू प्रोत्साहन योजनेअंतर्गत सर्व गरीब परिवारातील मुलींच्या जन्मावर सेविंग बोंड प्रदान करण्यात येतील. पाच वर्षात राज्यातील अडीच लाख युवकांना सरकारी नोकऱ्या प्रदान करण्यात येतील. गव्हाला किमान आधारभूत किमतीच्या वर २७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्यात येईल. वैद्यकीय शिक्षणासाठी सहा हजार अतिरिक्त जागा तयार करण्यात येतील.

छत्तीसग़डमध्ये काँग्रेसच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे:

यापूर्वी केल्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल. छत्तीसगडमध्ये ३२०० रुपये धानाला भाव देण्यात येईल. सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयात केजी ते पीजी मोफत शिक्षण देण्यात येईल. तेंदूपत्त्याला प्रति बॅग सहा हजार रुपये देण्यात येतील. २०० युनिट पर्यंत मोफत वीज देण्यात येईल.

छत्तीसग़डमध्ये भाजपाच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे:

प्रत्येक विवाहित महिलेला दरवर्षी १२हजार रुपये दिले जातील. पंतप्रधान आवास योजनेतून १८ लाख घर तयार करण्यात येतील. तेंदूपत्त्याला चांगला भाव देण्यात येईल. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंत आरोग्य सेवा देण्यात येतील. ५०० नवे जन औषधी केंद्र सुरू करण्यात येतील. गॅस कनेक्शन ५०० रुपयांमध्ये देण्यात येईल तसेच अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या दर्शनासाठी योजना सुरू करण्यात येईल.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे:

दिव्यांगजणांच्या पेन्शनमध्ये वाढ करून दोन हजार रुपये करण्यात येईल. जातनिहाय जनगणना करण्यात येईल. शासकीय सेवेमध्ये आणि योजनांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यात येईल. शालेय शिक्षण मोफत करण्यात येईल. काँग्रेसच्या काळातील पेसा कायदा आवश्यक प्रभाव असलेल्या भागांमध्ये लागू करण्यात येईल. महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये नारी सन्मान निधीच्या रूपात देण्यात येईल. घरगुती गॅस सिलेंडर पाचशे रुपयात देण्यात येईल. १०० युनिट वीज मोफत देण्यात येईल तर २०० युनिट विजेला अर्धेदर लागतील.

मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे:

धान आणि गव्हाला २७०० रु आणि ३१०० रु किमान आधारभूत किंमत देण्यात येईल. दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिकांना दीड हजार रुपये प्रति महिना पेन्शन देण्यात येईल. अटल ज्योती योजनेअंतर्गत शंभर रुपयांमध्ये १०० युनिट वीज देण्यात येईल. प्रत्येक परिवारात एका व्यक्तीला रोजगार किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. ४५० रुपयात गॅस सिलेंडर देण्यात येईल. विविध धार्मिक स्थळांना विकास करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा विशेष बजेट देण्यात येईल. नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात येईल.

तेलंगणामध्ये काँग्रेसच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे:

सत्तेत आल्यास महिलांना अडीच हजार रुपये प्रति महिना देण्यात येईल. पाचशे रुपयांमध्ये गॅस सिलेंडर देण्यात येईल. प्रत्येक घरात २०० युनिट वीज मोफत देण्यात येईल. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना १५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. शेतीत काम करणाऱ्या मजुरांना 12 हजार रुपये देण्यात येतील. पात्र लाभार्थ्यांना दहा लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल.

तेलंगणामध्ये बीआरएसच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे:

पाच लाख रुपयांचा विमा देण्यात येईल. प्रत्येक परिवाराला दहा लाख रुपये अनुदानाची 'दलित बंधू' योजना सुरुवात करण्यात येईल. ९३ लाख परिवारांना जीवन विमा देण्यात येईल. हैदराबादमध्ये एक लाख घर बनवण्यात येतील. आसरा पेन्शनची रक्कम वाढवून ३ हजार करण्यात येईल. जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करण्यात येईल.

तेलंगणामध्ये भाजपच्या घोषणा पत्रातील प्रमुख मुद्दे:

पेट्रोल, डिझेल वरील व्हॅट कमी  करण्यात येईल. उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक चार गॅस सिलेंडर मोफत देण्यात येतील. छोट्या शेतकऱ्यांना बी बियाणे घेण्यासाठी मदत अडीच हजार रुपये मदत करण्यात येईल. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्यात येतील. जन्मतः मुलीला दोन लाख रुपये देण्यात येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news