

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष करण्याबरोबरच मराठा समाजातील तरुणांना उद्योजकतेचे धडे देण्यासाठी मराठा महासंघाने १९ डिसेंबरला दिल्लीमध्ये जागतिक मराठा संसद घेण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये देशात आणि जगभरात कर्तृत्वाचा झेंडा रोवणारे मराठा उद्योजक, तंत्रज्ञ सहभागी होऊन मार्गदर्शन करतील, अशी माहिती मराठा महासंघाने दिली आहे.
मराठा महासंघ आणि मुंबईतील राष्ट्रीय नागरी पर्यावरण संरक्षण इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट यांच्या समन्वयातून दिल्लीतील विज्ञान भवनात जागतिक मराठा संसद होणार आहे. देशातील आणि परदेशातील नामवंत मराठा उद्योजकांकडून तरुणांना परदेशातील नोकरीच्या संधींबाबत मार्गदर्शन मिळावे हा या मराठा संसदेचा प्रमुख उद्देश असल्याचे मराठा महासंघाचे उपाध्यक्ष संतोश नानावटे यांनी सांगितले. यात अमेरिका, जपान, जर्मनीसह अन्य देशांमध्ये कर्तृत्व गाजविणाऱ्या मराठा उद्योजकांचा सत्कारही केला जाणार आहे.
दिल्लीतील विज्ञान भवनात जागतिक मराठा संसद होणार असून यात पाचशे प्रतिनिधींचा सहभाग अपेक्षित असेल. या कार्यक्रमासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनकड, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आदी मान्यवरांना निमंत्रण दिले जाणार असल्याचे मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.