Uttarakhand Tunnel : उत्तराखंडात बोगदा कोसळल्याच्या ठिकाणी आंदोलन

Uttarakhand Tunnel Crash
Uttarakhand Tunnel Crash

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उत्तराखंडातील बोगद्यात अडकलेल्या लोकांना तीन दिवस उलटूनही बाहेर काढता आले नाही. आत अडकलेल्या ४० कामगारांना बाहेर काढण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांनी आणि इतर कामगारांनी बोगद्याबाहेर निदर्शने केली. कामगारांच्या संतप्त जमावाने घटनास्थळी थोडी तोडफोड देखील केली. अखेर पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून कामगारांना पांगवले.

बोगद्यातून ढिगारा हटवला जात असताना वरून अधिक ढिगारा येत असल्याने बोगदा उघडणे अत्यंत कठीण होत आहे. रात्री उशिरा ड्रिलिंग सुरू असताना ड्रिलिंग मशिनमध्ये बिघाड झाल्याने बचावकार्य थांबवावे लागले. बचावपथकाव्दारे मशीनच्या सहाय्याने ढिगारा बाजूला करत असतांना अचानक वरून पडलेल्या ढिगाऱ्याखाली बुमर मशीन आणि शॉटक्रीट मशीन गाडले गेले. यावेळी काम करणाऱ्या मजुरांनाही स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळावे लागले.

उत्तरकाशीतील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्क्यरा आणि दंडलगाव दरम्यान बांधण्यात येत असलेल्या बोगद्याचा काही भाग रविवारी कोसळला होता. दरड कोसळल्याने सुमारे ४० मजूर ७२ तासांहून अधिक काळ ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून कामगारांच्या सुटकेचे प्रशासनाचे प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. मंगळवारी संध्याकाळी सुटकेचा मार्ग तयार करण्यासाठी आणणेल्या मशीन्स काम करू शकल्या नाहीत तेव्हा पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे कामगारांनी आपला संताप व्यक्त केला.

काल भूस्खलनात ढिगारा पडल्याने बोगद्याच्या तुटलेल्या भागात स्टीलचे पाईप टाकण्यात अडथळे आले. ड्रिलिंग ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी दिल्लीहून बदली मशीन आणली जात आहे. सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत असून कामगारांशी सतत संपर्क प्रस्थापित करण्यात येत आहे. त्यांना अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूही पाईपद्वारे पुरवल्या जात आहेत.

आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने जाहीर केलेल्या अडकलेल्या कामगारांच्या यादीनुसार, झारखंडमधील १५, उत्तर प्रदेशातील ८, ओडिशातील ५, बिहारमधील ४, पश्चिम बंगालमधील ३, उत्तराखंड आणि आसाममधील प्रत्येकी २ आणि हिमाचल प्रदेशमधील एक कामगारांचा समावेश आहे.

रेस्क्यूसाठी दिल्लीहून मागवली ज्यादा क्षमतेची मोठी मशीन

अभियंता आणि ड्रिलिंग तज्ञ आदेश जैन यांनी सांगितले की, १४  नोव्हेंबरपर्यंत सहा वेळा ढिगारा खाली पडला आहे त्यामुळे ढिगारा तब्बल ७० मीटरपर्यंत वाढला आहे. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये असलेली मशीन फक्त ४५ मीटर पर्यंत काम करू शकते म्हणूनच दिल्लीहून सुमारे ७०  मीटर क्षमतेपेक्षा मोठी मशीन आणण्यात आली आहे. नवीन मशीनला आधार देण्यासाठी आम्ही पायाभूत सुविधा तयार केल्या असून उद्या संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत सर्वांना बोगद्यातून सुखरूप बाहेर काढले जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news