Lunar Eclipse : कोजागिरी पोर्णिमेला वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; जाणून घ्या वेळ | पुढारी

Lunar Eclipse : कोजागिरी पोर्णिमेला वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण; जाणून घ्या वेळ

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण २८ ऑक्टोबर २०२३ ला मध्यरात्री होणार आहे. भारतातून रात्री १.०५ वाजेपासून २.२२ पर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण पाहता येईल. हे चंद्रग्रहण भारतासह आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका,आस्ट्रेलिया खंडातून दिसणार आहे. खगोल प्रेमी आणि विद्यार्थ्यांनी खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे यांनी केले आहे.

२८ ऑक्टोबरला मध्यरात्री शरद पौर्णिमेला चंद्र मेष राशीत दिसेल. छायाकल्प चंद्रग्रहण ११.३१ वाजता सुरू होईल. ०१.०५ मिनिटाने खंडग्रास ग्रहण सुरूवात होईल. ०१.४४ ला सर्वाधिक ग्रहण होईल. यावेळी चंद्र १० ते १२ % ग्रस्तोदित असेल. ०२.२२ मिनिटाने खंडग्रास ग्रहण संपेल परंतु साध्या डोळ्याने न दिसणारे छायाकल्प चंद्रग्रहण ०३.५६ वाजता संपेल. संपूर्ण ग्रहणाचा काळ ४.२५ तासाचे तर खंडग्रास ग्रहण ०१.१८ तासाचे असेल. ह्या वर्षीचे पाहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी झाले होते. हे ह्या वर्षांतील शेवटचे ग्रहण असेल.

चंद्रग्रहण का घडते ?

जेव्हा सूर्य,पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहणे होतात .जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वी ची सावली चंद्रावर पडते,त्यामुळे चंद्र ग्रहण होते. चंद्र ग्रहणाचे छायाकल्प, खंडग्रास आणि खग्रास असे तीन प्रकार आहेत. ह्यावेळेसचे चंद्रग्रहण खंडग्रास प्रकारातील आहे. ह्याच महिन्यात १४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण झाले होते. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण एकामागोमाग येत असतात.

चंद्र-गुरू ग्रहाची युती पाहण्याची संधी

शरद पौर्णिमेला होणाऱ्या ह्या ग्रहणावेळी चंद्रासोबत पृथ्वीच्या जवळ येत असलेल्या गुरू ग्रहाची युती दिसेल.गुरू ग्रह पुढील आठवड्यात पृथ्वी जवळ येत असल्याने आकाराने मोठा आणि तेजस्वी दिसेल. देशातील सर्व खगोल प्रेमीं आणि विध्यार्थ्यांनी वेज्ञानिक दृष्टीकोनातून चंद्रग्रहण पहावे असे आवाहन प्रा सुरेश चोपणे ह्यानी केले आहे.

Back to top button