

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरातुन मिळालेली स्मृतिचिन्हे आणि भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव सुरू आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची सर्वात जास्त मागणी आहे, त्यावर सर्वात जास्त बोलीदेखील लावली जात आहे. लिलावाची ही प्रक्रिया २ ऑक्टोबरला सुरू झाली असुन ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू असणार आहे. संस्कृती विभागाच्या केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांनी पत्रकारपरिषदेतुन ही माहिती दिली आहे.
या लिलावात ज्या दुर्मिळ वस्तूंना प्रामुख्याने मागणी आहे त्यामध्ये महाराष्ट्रातून भेट देण्यात आलेल्या तारपा वाद्याचा देखील समावेश आहे. तसेच कर्नाटकच्या यक्षगाण नृत्याच्या वेळी डोक्यावर लावले जाणारे मुकुट आहे. हा लिलाव म्हणजे भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचा उपक्रम आहे. २०२३ या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध राज्यातून विविध कार्यक्रमानिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या. यामध्ये मूर्ती, स्केचेस, पेंटिंग्स, शिल्प, वस्त्र, फेटे, तलवार अशा ९०० हुन अधिक भेटवस्तू आणि स्मृतीचिन्ह आहेत. या सर्व वस्तूंचे प्रदर्शन राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात सुरू आहे. त्याचबरोबर pmmementos.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून देशातील नागरीकांना लिलावात सहभागी होता येणार आहे.
या सर्व भेटवस्तूंचा लिलाव पार पडल्यानंतर यातून जमा होणारी संपुर्ण रक्कम नमामी गंगे प्रकल्पासाठी खर्च केली जाणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेक लोक आपले घर सजवण्यासाठी अनेक वस्तू घेतात. लोकांना पंतप्रधानांना भेट मिळालेल्या वस्तू आता विकत घेता येणार आहे. या वस्तू केवळ घरीच नव्हे तर कलासंग्रहालयात देखील ठेवता येण्यासारख्या आहेत. यातील अनेक वस्तू अलीकडे दुर्मीळ होत चालल्या आहेत, त्यांना तयार करणारे कलाकार देखील दुर्मीळ होत आहेत. हा लिलाव केवळ पैशाची गोष्ट नाही तर आपल्या देशातील आदर्श कलेचा वारसा या निमित्ताने आपल्याला सोबत ठेवता येणार आहे, याद्वारे आपल्या देशातील कलेचा, कलाकारांचा आणि त्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे, असेही मिनाक्षी लेखी यावेळी म्हणाल्या. दरम्यान या लिलावात आतापर्यंत हजारो लोकांनी सहभाग घेतला असून अंतिम आकडे ३१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंमध्ये महाराष्ट्रातीलही विविध वस्तूंचा समावेश आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठल रखुमाईची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरील पुतळा यांचा समावेश आहे. तसेच लोकमान्य टिळक यांचा पुतळा, महाराष्ट्रातील तारपा वाद्याचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून देण्यात आलेल्या सर्व वस्तूंना मोठी मागणी देखील आहे.