

बेंगलुरू ; पुढारी ऑनलाईन बंगळुरूमध्ये आयकराच्या छाप्यात 23 बॉक्समध्ये 42 कोटी रुपयांची रोकड सापडली. एवढी मोठी रक्कम पाहून अधिकाऱ्यांनाही आश्चर्य वाटले. ही रोकड आयकर पथकाने ताब्यात घेतली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यावरून राजकारणही सुरू झाले आहे. काँग्रेसने हे पैसे कंत्राटदारांकडून कमिशन म्हणून घेतल्याचा आरोप भाजपने केला आहे.
आयकर विभागाने कर्नाटकातील काही कंत्राटदार आणि त्यांच्याशी संबंधित लोकांकडून 42 कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. सध्या ही कारवाई सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. किती रोकड आहे हे शोधण्यासाठी नोट मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही रोकड कर्नाटकच्या राजधानीत एका निवासी संकुलातून सापडली, जिथे कोणीही राहत नव्हते. ही रोकड पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आली होती.
भाजप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सीएन अश्वथ नारायण यांनी या प्रकरणावरून काँग्रेस सरकारवर निशाणा साधला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ही रक्कम कंत्राटदारांकडून कमिशन म्हणून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. ही अत्यंत नाममात्र रक्कम आहे, जी आयकर विभागाने पकडली आहे. हा फक्त नमुना आहे असा आरोप भाजपने केला आहे.
भाजप नेते आणि आमदार एन रवी कुमार यांनी दावा केला की, कंत्राटदाराकडून वसूल केलेल्या आणि आयटीने जमा केलेल्या रकमेपैकी 42 कोटी रुपये आहेत. यामध्ये 23 बॉक्समध्ये ठेवलेल्या 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. ही रोकड तेलंगणा निवडणुकीसाठी जमा केल्याचेही समोर येत आहे. ही रोकड कंत्राटदारांकडून 650 कोटी रुपयांच्या प्रलंबित पेमेंटसाठी कमिशन म्हणून घेण्यात आली होती. रवी कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. भाजपच्या इतर अनेक नेत्यांनीही काँग्रेसवर असेच आरोप केले आहेत.
छापेमारीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या काय म्हणाले?
या प्रकरणावर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, हे आरोप निराधार आहेत. कोणी कोणाकडे पैसे मागितले नाहीत. आरोप करणाऱ्यांकडे कोणते पुरावे आहेत का? हे फक्त भाजपचे लोक करत आहेत का? या प्रकरणी राजकारण केले जात असल्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सांगितले. छत्तीसगड, तेलंगणा आणि इतर राज्यांमध्ये काय चालले आहे तेही आम्हाला माहीत आहे. जिथे भाजपची सत्ता आहे तिथे काहीही होणार नाही. जिथे भाजप सत्तेत नाही तिथे अशा घटना घडतात असा आरोप त्यांनी केला.
हेही वाचा :