Congress : जात जनगणनेवरून काँग्रेसमध्ये गोंधळ; सिंघवी यांनी राहुल गांधींना दिलेला ‘तो’ सल्ला चर्चेत | पुढारी

Congress : जात जनगणनेवरून काँग्रेसमध्ये गोंधळ; सिंघवी यांनी राहुल गांधींना दिलेला 'तो' सल्ला चर्चेत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बिहारमध्ये झालेल्या जातजनगणनेला कॉंग्रेसने पाठिंबा दिला असला तरी पक्षाचे वरिष्ठ नेते अभिषेक सिंघवी यांनी यासंदर्भात सोशल मिडियावर व्यक्त केलेल्या मतातून वेगळा अर्थ ध्वनीत होत असल्याने कॉंग्रेसमध्ये गोंधळ उडाला. कॉंग्रेसची भूमिका जनगणनेच्या समर्थनाची असून सिंघवी यांचे मत व्यक्तिगत स्वरुपाचे असल्याचे म्हणत सरचिटणीस जयराम रमेश यांनी यापासून अंतर राखले.

जातजनगणनेच्या मुद्द्यावर कॉंग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी सोशल मिडिया साईट एक्स (पुर्वाश्रमीचे ट्विटर) यावर आपले मत मांडताना अधिक लोकसंख्या, अधिक अधिकार’ या कल्पनेचा परिणाम शेवटी ‘बहुसंख्यवाद’ होईल, अशी टिप्पणी केली होती. संधीची समानता ही परिणामांची समानता कधीच नसते, अशीही टिप्पणी सिंघवी यांनी यात केली होती. त्यांच्या या अभिप्रायानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता जाणवू लागली. सर्वप्रथम, काँग्रेसचे सरचिटणीस आणि माध्यमविभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी निवेदन जारी करून जनगणनेच्या मुद्द्यावर अभिषेक सिंघवी यांनी व्यक्त केलेल्या मताशी कॉंग्रेस पक्ष सहमत नाही असे स्पष्टीकरण दिले. एवढेच नव्हे तर, सिंघवी यांचे हे मत व्यक्तिगत स्वरुपाचे असल्याचे म्हणत सिंघवी यांच्यापासून अंतरही राखले. अखेरीस सिंघवी यांनी आपले ट्विट मागे घेऊन या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

या घटनाक्रमानंतर कॉंग्रेसचे संघटनासरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले की कॉंग्रेस पक्ष जात जनगणनेच्या बाजूने आहे. छत्तीसगडमधये झालेल्या महाधिवेशनात आणि हैदराबादमध्ये झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये मंजूर ठरावांच्या आधारे कॉंग्रेसने जातनिहाय जनगणनेची मागणी केली असल्याचेही वेणूगोपाल यांनी सांगितले. अभिषेक मनू सिंघवी यांच्या मताबद्दल विचारले असता कॉंग्रेसपक्ष त्यांच्या मताशी सहमत नसल्यामुळे सिंघवी यांचे ट्विट आता अस्तित्वात नाही, असे स्पष्टीकरण देत या वेणूगोपाल यांनी या मुद्द्याला महत्त्व देण्याचे टाळले. पाठोपाठ अभिषेक सिंघवी यांनीही, सोशल मिडियावर आपण व्यक्त केलेले मत पक्षाच्या भूमिकेविरोधात नव्हते अशी सारवासारव केली.

Back to top button