Anand Mahindra : आनंद महिंद्रांसह कंपनीच्या १३ कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल; स्कॉर्पिओ कार ग्राहकाची फसवणूक | पुढारी

Anand Mahindra : आनंद महिंद्रांसह कंपनीच्या १३ कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल; स्कॉर्पिओ कार ग्राहकाची फसवणूक

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध व्यावसायिक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) आणि महिंद्रा कंपनीच्या 13 कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. युपीतील एका व्यक्तीने तक्रार दिलेली होती. या तक्रारीनंतर महिंद्रा यांच्यासह कर्मचाऱ्यांवर फसवणुकीसह गंभीर कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युपी येथील राजेश मिश्रा (रा. कानपूर) या व्यक्तीने आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्यासह कर्मचाऱ्यांवर रायपुरवा पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीमध्ये केलेल्या आरोपांनुसार, महिंद्राच्या कर्मचाऱ्यांनी एअरबॅग्जशिवाय स्कॉर्पिओ विकली, त्यामुळे त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू झाला. तक्रारदार राजेश मिश्रा हे जुहीचे रहिवासी आहेत.

स्कॉर्पिओ खरेदी करताना फिचर्सची दिलेली माहिती

मिश्रा यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, 2 डिसेंबर 2020 रोजी जरीब चौकी येथील तिरुपती ऑटोमधून 17.39 लाख रुपयांची काळी स्कॉर्पिओ खरेदी केली होती. कंपनीकडून वाहनाच्या फिचर्स आणि सुरक्षिततेबाबत माहिती देण्यात आली. आनंद महिंद्रा यांनी विविध सोशल मीडियावर दाखवलेली जाहिरातही त्यांनी पाहिली होती. त्यानंतर मिश्रा यांनी कार खरेदी केली.

मिश्रा यांनी त्यांचा मुलगा डॉ. अपूर्व मिश्रा याला ही स्कॉर्पिओ भेट दिली होती. 14 जानेवारी 2022 रोजी, अपूर्वा लखनौहून कानपूरला मित्रांसह परतत असताना कार दुभाजकाला धडकली आणि धुक्यामुळे उलटली आणि अपूर्वाचा मृत्यू झाला. 29 जानेवारी रोजी त्यांनी तिरुपती ऑटोमध्ये जाऊन कारमधील दोषांची माहिती दिली आणि अपघाताच्या वेळी सीटबेल्ट लावलेला असतानाही एअरबॅग्ज उघडली नसल्याची तक्रार केली. यावरुन मिश्रा यांनी स्कॉर्पिओ कार खरेदी करताना फिचर माहिती दिली ते फिचर नसल्याने फसवणूक केल्याचा आरोप केला. वाहनाची नीट तपासणी केली असती तर माझ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला नसता, असे राजेश मिश्रा यांनी सांगितले.

दरम्यान या मुद्द्यावर बोलत असताना कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मिश्रा यांच्याशी वाद घातला. त्यामुळे मिश्रा यांनी संचालक चंद्र प्रकाश गुरनानी, विक्रम सिंग मेहता, राजेश गणेश जेजुरीकर, मुथय्या मुरगप्पन मुथय्या, विशाखा निरुभाई देसाई, निस्बाह गोदरेज, आनंद गोपाल महिंद्रा, सिखासंजय शर्मा, विजय कुमार शर्मा या संचालकांशी फोनवरुन संपर्क साधला. मात्र या फोननंतर मिश्रा यांनी त्यांना कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचे आरोप केले.

पोलिसांनी महिंद्रा यांच्यासह कर्मचाऱ्यांवर दाखल केले गुन्हा

या सर्व प्रकारानंतर राजेश मिश्रा यांनी रायपुरवा पोलीस ठाण्यात आनंद गोपाल महिंद्रा यांच्यासह १३ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 287 (यंत्रसामग्रीच्या बाबतीत निष्काळजी वर्तन), 304-A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आणि आणखी अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तांत्रिक तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

Scorpio S9 मधील एअरबॅग्जमध्ये कोणताही बिघाड नव्हता : महिंद्रा अँड महिंद्रा

दरम्यान, २३ सप्टेंबर रोजी दाखल झालेल्या एफआयआरच्या संदर्भात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने खुलासा केला आहे. हे प्रकरण सुमारे १८ महिन्यांपूर्वीचे आहे आणि ही घटना जानेवारी २०२२ मध्ये घडली होती. वाहनात एअरबॅग्ज नसल्याचा आरोप करण्यात आला. म्हणून आम्ही पुन्‍हा पुष्‍टी करू इच्छितो की, २०२० मध्‍ये निर्मिती केलेल्या Scorpio S9 व्हेरिएंटमध्ये एअरबॅग्ज आहेत. आम्ही याचा तपास केला असून एअरबॅग्जमध्ये कोणताही बिघाड दिसून आला नाही. हे एक रोलओव्हर केस होती ज्यामध्ये समोरील एअरबॅग्ज उघडू शकल्या नाहीत, असे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्रवक्त्यानी म्हटले आहे.

हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि पुढील तपासासाठी आम्ही अधिकाऱ्यांना सहकार्य करु. आम्ही त्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो, असेही पुढे त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा

Back to top button