Gurpatwant Singh Pannun : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची चंदीगडमधील मालमत्ता जप्त; NIAची कारवाई | पुढारी

Gurpatwant Singh Pannun : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची चंदीगडमधील मालमत्ता जप्त; NIAची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्यावर मोठी कारवाई केली आहे. एनआयएने चंदीगड आणि अमृतसरमधील त्याची मालमत्ता जप्त करत कठोर पाऊल उचलले आहे.

पन्नून हा अमृतसरचा रहिवासी आहे. भारताने त्याला खलिस्तानी दहशतवादी घोषित केले आहे. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत बंदी घातलेल्या SFJ संघटनेचा गुरपतवंत सिंग पन्नून हा प्रमुख आहे. आज एनआयएने त्याची मालमत्ता जप्त करत कारवाई केली आहे.

पन्नूनच्या चंदीगडमधील सेक्टर 15 येथील घराबाहेर मालमत्ता जप्तीची नोटीस लावलेली आहे. यामध्ये लिहिलेल आहे की, “घर क्र. #2033 सेक्टर 15-सी, चंदीगड, गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या मालकीचे, NIA प्रकरणात ‘घोषित गुन्हेगार’ RC- 19/2020/NIA/DLI, राज्य अंतर्गत बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायद्याच्या कलम 33(5) जप्त करण्यात आले आहे. 1967 NIA विशेष न्यायालय, SAS नगर, मोहाली, पंजाब, दिनांक 14/09/2023 च्या आदेशानुसार. हे सर्वसामान्यांच्या माहितीसाठी आहे.”

भारत सरकारकडून SFJ ही बेकायदेशीर संघटना म्हणून घोषीत

भारत सरकारने, 10 जुलै 2019 रोजीच्या अधिसूचनेद्वारे, SFJ ला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आणि त्यावर पाच वर्षांसाठी बंदी घातली. याशिवाय पंजाबमध्ये ‘स्वतंत्र आणि सार्वभौम देश’ स्थापन करणे हा या संघटनेचा प्राथमिक उद्देश असून ती खलिस्तानला उघडपणे पाठिंबा देत असल्याचे भारत सरकारने म्हटले होते. ही संघटना भारताच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला आव्हान देते.

Back to top button