फटाक्यांच्या वापरावर बंदी! दिल्ली सरकारने पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना | पुढारी

फटाक्यांच्या वापरावर बंदी! दिल्ली सरकारने पोलिसांना दिल्या 'या' सूचना

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीकरांना या वर्षीही फटाके फोडता येणार नाही. दरवर्षी हिवाळ्यात भेडसावणाऱ्या वायू प्रदुषणाच्या उपद्रवामुळे दिल्लीतील केजरीवाल सरकारने यंदाही फटाक्यांवर बंदीची घोषणा केली असून शेजारच्या राज्यांनाही फटाक्यांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्याचे आवाहन केले आहे.

केजरीवाल सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आज (दि. ११) या फटाके बंदीची घोषणा केली. प्रदूषण रोखण्यासाठी हिवाळ्यामध्ये फटाक्यांचे उत्पादन,साठवण आणि वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतल्याचे ते म्हणाले. दिल्ली सरकारने फटाके बंदीच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. मंत्री गोपाल राय म्हणाले, की राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये दिल्ली पोलिसांनी फटाक्यांशी संबंधित परवाने देऊ नयेत असे कळविण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धेचा आदर व्हावा आणि लोकांचे प्राणही वाचायला हवेत. त्यामुळे दिल्लीकर दिवे लावून दिवाळी साजरी करतील. दिल्लीतील प्रदूषणाच्या हॉटस्पॉटवर देखरेख सुरू करण्यात आली असून हिवाळी कृती योजना लागू केली जाईल. दिल्लीतील सदर बाजार, चांदणी चौक, कोटला, रोहिणी, लक्ष्मी नगर याबाजारपेठा फटाके विक्रीची प्रमुख केंद्रे  आहेत.

दिल्लीमध्ये ऑक्टोबरपासून हवेची गुणवत्ता खराब होण्यास सुरवात होते. याच हंगामात राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात पंजाब, हरियाना, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान या भागामध्ये पिकांचे उरलेले अवशेष (पराली) जाळण्यास सुरवात होते. त्याचा परिणाम दिल्लीतील हवेवर होतो. याच कालावधीत दिवाळीमध्ये फटाके फोडले जात असल्याने प्रदूषणाची स्थिती आणखी बिकट होते. त्यापार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने काही आठवड्यांपूर्वी हिवाळी कृती योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत हिवाळ्यात दिल्लीतील ५००० एकरपेक्षा जास्त शेतात बायो डी कंपोझरची मोफत फवारणी केली जाणार आहे. यामुळे देशाच्या राजधानीतील प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे केजरीवाल सरकारचे म्हणणे आहे.

Back to top button