भारतीय संगीत क्षेत्रावर शोककळा! शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन | पुढारी

भारतीय संगीत क्षेत्रावर शोककळा! शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे आज (दि. ६ सप्टेंबर) निधन झाले. त्यांच्या या निधन वार्तानंतर भारतीय संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. राजूरकर या ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायका होत्या.

मालिनी राजूरकर यांचा जन्म 8 जानेवारी 1941 रोजी झाला. आज त्यांच्या मृत्यूनंतर भारतीय संगीत क्षेत्रात दु:खाचं सावट निर्माण झालं. त्यांचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी 5:30 ते 6:30 या वेळेत दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे.

राजस्थानमध्ये मालिनी राजूरकर यांचे बालपण

मालिनी राजूरकर यांचे बालपण राजस्थान राज्यात गेले. त्यांनी अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमधून गणित विषयात पदवी पूर्ण केली आणि तीन वर्षे तेथे गणित शिकवले. तीन वर्षांच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन त्यांनी अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर आणि त्यांचे पुतणे वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांचा विवाह वसंतराव राजूरकर यांच्याशी झाला.

मालिनी राजूरकरांनी भारतातील नामांकित संगीत महोत्सवांतून आपली कला सादर केली आहे. यामध्ये गुणीदास संमेलन (मुंबई), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) आणि शंकर लाल महोत्सव (दिल्ली) या संगीत महोत्सवांचा समावेश आहे. मालिनीताईंचे टप्पा गायकीवर विशेष प्रभुत्व आहे. त्यांनी उपशास्त्रीय गायनही केले आहे. ‘पांडू-नृपती जनक जया’ व ‘नरवर कृष्णासमान’ ही त्यांनी गायलेली दोन मराठी नाट्यगीते विशेष लोकप्रिय आहेत.

हेही वाचा

Back to top button