मदुराई रेल्वे यार्डात खासगी डब्याला आग; उत्तर प्रदेशातील 10 प्रवाशांचा मृत्यू

मदुराई रेल्वे यार्डात खासगी डब्याला आग; उत्तर प्रदेशातील 10 प्रवाशांचा मृत्यू

मदुराई : वृत्तसंस्था तामिळनाडूतील मदुराई रेल्वेस्थानकाजवळ रामेश्वरमला जाणार्‍या लखनौ-रामेश्वर एक्स्प्रेस या रेल्वेत खासगी म्हणून आरक्षित करण्यात आलेल्या बोगीत बेकायदा सिलिंडरमुळे आग लागून 20 वर लोक होरपळले. त्यातील 10 जणांचा मृत्यू झाला आहे. डब्यात कॉफी बनवत असताना सिलिंडरचा स्फोट होऊन ही आग लागली.

बहुतांश मृत उत्तर प्रदेशचे असून, सीतापूरच्या एका ट्रॅव्हल एजन्सीने या डब्याचे बुकिंग केले होते. त्यात 63 जण होते. शनिवारी पहाटे 5.15 च्या सुमारास आग लागली. यावेळी रेल्वे मदुराई जंक्शनच्या यार्डवर थांबलेली होती. रेल्वे कर्मचार्‍यांनी पाण्याचा वर्षाव करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; पण काहीही परिणाम झाला नाही. नंतर अग्निशमन दल दाखल झाले. दलाने पावणेसहा वाजता आग विझविण्याचे काम सुरू केले. सकाळी सव्वासातपर्यंत आग आटोक्यात आली. अन्य डब्यांपर्यंत आग पोहोचण्यापूर्वीच ती आटोक्यात आली, हे सुदैव! तत्पूर्वी, रेल्वेने लागून असलेल्या बोगी वेगळ्या करण्याचे कामही सुरू केले होते. आगीत एक बोगी पूर्णपणे जळून खाक झाली.

'आयआरसीटीसी'च्या माध्यमातून कुणीही रेल्वे डबा आरक्षित करू शकत असले, तरीही त्यातून सिलिंडर नेण्यास बंदी आहे. याउपर एक प्रवासी सिलिंडर घेऊन डब्यात चढलेला होता. या सिलिंडरमुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते. दुर्घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात महिलेसह अनेक प्रवासी वाचवा वाचवा म्हणून ओरडत आहेत. थोडा वेळ हा आवाज सुरू असतो. नंतर कायमचा शांत होतो.

दहा लाख भरपाई

  • विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांसह रेल्वेचे अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.
  • रेल्वेने मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
  • जखमींना मदुराईच्या शासकीय राजाजी महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news