Delhi Rape Case : मित्राच्या अल्पवयीन मुलीवर दिल्लीतील अधिकाऱ्याकडून अत्याचार, आरोपी अटकेत | पुढारी

Delhi Rape Case : मित्राच्या अल्पवयीन मुलीवर दिल्लीतील अधिकाऱ्याकडून अत्याचार, आरोपी अटकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दिल्ली सरकारच्या महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे. शिवाय पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रमोदय खाखा असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. अधिकारी प्रेमोदय खाखा याच्या पत्नीलाही पतीला क्रूरतेत साथ दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आरोप केला आहे की, अल्पवयीन पीडितेला रुग्णालयात भेटू दिले जात नाही. (Delhi Rape Case)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना या अधिकाऱ्याला निलंबित करण्यास सांगितले होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी मुख्य सचिव नरेश कुमार यांच्याकडून सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अहवाल मागवला आहे. आरोपी प्रेमोदय खाखा आणि त्याच्या पत्नीला दिल्ली पोलिसांनी अटक करण्यापूर्वी ताब्यात घेतले होते. (Delhi Rape Case)

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आरोप केला की, तिला अल्पवयीन पीडितेला रुग्णालयात भेटू दिले जात नाही. स्वाती मालीवाल म्हणाल्या, “अर्ध्या तासापासून रुग्णालय प्रशासन मला अल्पवयीन पीडितेला भेटण्यापासून रोखत आहे. पोलिसांनी मनाई केल्याचे रक्षक सांगत आहेत. काय चालू आहे? एक तर तुम्ही आरोपीला अटक करत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला मुलीला भेटण्यापासून रोखत आहात. दिल्ली पोलिसांना काय लपवायचे आहे?”

वडिलांच्या मृत्यूनंतर अल्पवयीन मुलीचा छळ

अधिकारी अल्पवयीन मुलीचा कौटुंबिक मित्र होता. तिचे वय १७ वर्षांच्या दरम्यान असून ती १२ वी ची विद्यार्थिनी आहे. २०२० मध्ये तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आरोपीने तिला आपल्या घरी आणले होते. पीडित मुलगी ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत आरोपीच्या घरी राहत होती. त्यादरम्यान तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार आणि शारीरिक छळ करण्यात आला. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीच्या पत्नीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. (Delhi Rape Case)

दिल्ली पोलिसांनी कारवाईवर काय म्हटले? (Delhi Rape Case)

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्याबद्दल उत्तर जिल्हा डीसीपी सागर सिंह कलसी म्हणतात, ‘या प्रकरणात आम्ही दोन आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी प्रेमोदय खाखा महिला आणि बाल विकास विभागातील उपसंचालक आहेत. दरम्यान, आरोपीच्या या कृत्याबद्दल त्याच्या पत्नीसही माहिती होती. आरोपीची पत्नी सीमा राणी हिने पीडितेस गर्भपात करण्यास भाग पाडले होते. (Delhi Rape Case)

हेही वाचलंत का?

Back to top button