Pending Court Cases : सीबीआयने तपासलेली भ्रष्टाचाराची ६ हजारांहून अधिक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित | पुढारी

Pending Court Cases : सीबीआयने तपासलेली भ्रष्टाचाराची ६ हजारांहून अधिक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय तपास संस्था सीबीआयने तपासलेली भ्रष्टाचाराची तब्बल ६ हजार ८४१ प्रकरणे वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणांपैकी ३१३ प्रकरणे दोन दशकांहून अधिक काळापासून प्रलंबित आहे.केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) ताज्या वार्षिक अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे.

३१ डिसेंबर २०२२ पर्यंतच्या माहितीनूसार प्रलंबित एकूण प्रकरणांपैकी २ हजार ३९ खटले १० वर्षांहून अधिक तर २० वर्षांपर्यंत, ५ वर्षांपासून अधिक आणि १० वर्षांपर्यंत  २ हजार ३२४ प्रकरणे, तीन वर्षांहून अधिक आणि पाच वर्षांपर्यंत ८४२ प्रकरणे  आणि १ हजार ३२३ प्रकरणी तीन वर्षांहून कमी काळापासून प्रलंबित आहे.

विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची आयोगाने दखल घेतली आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात एकूण १२ हजार ४०८ अपील आणि सुधारणा याचिका प्रलंबित आहेत.यापैकी ४१७ प्रकरणे २० वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित आहे.गुन्हा नोंदवल्यानंतर वर्षभरात त्याचा तपास पुर्ण करणे सीबीआयला आवश्यक असते. एकूण ६९२ प्रकरणे सीबीआयकडे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. तर, ४२ प्रकरणे पाच वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित आहेत,असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Back to top button