Wheat in open market : ५० लाख मेट्रिक टन गव्हाचा खुल्या बाजारात विक्रीचा केंद्राचा निर्णय | पुढारी

Wheat in open market : ५० लाख मेट्रिक टन गव्हाचा खुल्या बाजारात विक्रीचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ई-लिलावाच्या माध्यमातून देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेअंतर्गत भारतीय अन्न महामंडळातर्फे (एफसीआय) ५० लाख मेट्रिक टन गहू आणि २५ लाख मेट्रिक टन तांदूळ टप्प्याटप्प्याने खुल्या बाजारात विक्रीसाठी उतरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. एफसीआयतर्फे गेल्या काही काळात तांदळासाठी करण्यात आलेल्या ५ ई-लिलावांचा अनुभव लक्षात घेऊन यावेळी तांदळाचा राखीव दर क्विंटल मागे २०० रुपयांनी कमी करून प्रभावी मूल्य २,९०० रुपये प्रती क्विंटल ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.राखीव दरातील कपातीमुळे येणारा खर्च केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या देखरेखीखाली असलेल्या मूल्य स्थिरीकरण निधीमधून करण्यात येईल.
गेल्या वर्षभरात देशात गव्हाचे दर किरकोळ बाजारात ६.७७ टक्क्यांनी तर घाऊक बाजारात ७.३७ टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचप्रमाणे या काळात किरकोळ बाजारातील तांदळाच्या दरात १०.६३% आणि घाऊक बाजारात ११.१२ टक्क्यांची वाढ झाली.
देशातील १४० कोटीहून अधिक नागरिकांच्या हिताचा विचार करुन केंद्र सरकारने ओएमएसएस (डी) अंतर्गत खासगी संस्थांना गहू आणि तांदूळ विक्रीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे, या धान्यांची उपलब्धता वाढेल, बाजारभावातील वाढ आटोक्यात राहील आणि अन्नधान्याच्या महागाईवर नियंत्रण ठेवता येईल, असा विश्वास केंद्राने व्यक्त केला आहे.

Back to top button