

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मधून सोमवारी (15 डिसेंबर) घनदाट धुके आणि प्रदूषणाची पातळी गंभीर असल्यामुळे 61 उड्डाणे रद्द झाली, तर 400 हून अधिक उड्डाणांमध्ये विलंब झाला आहे. काही उड्डाणे इतर ठिकाणी वळवली आहेत.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या डेटानुसार, सकाळी 7.05 वाजता दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 454 वर नोंदवला गेला, जो गंभीर श्रेणीत येतो. रविवारच्या तुलनेत एक्यूआय 461 नोंदवला गेला होता, जो डिसेंबर महिन्यातील दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित दिवस ठरला. दिल्लीकडे येणारी किमान 5 उड्डाणे घन धुक्यामुळे वळविली गेली. अर्जेंटिनाचा महान फुटबॉल खेळाडू लियोनेल मेस्सी यांचा भारतीय टूरचा अंतिम टप्पा दिल्लीमध्ये होता. मेस्सीचे मुंबईहून दिल्लीकडे जाणारे उड्डाण काही तास विलंब झाल्यामुळे, ते सकाळी 11 वाजता पोहोचण्याऐवजी दुपारी 2 वाजून काही मिनिटांनी पोहोचले. दिल्ली विमानतळानेही सोमवारी सकाळी प्रवाशांसाठी प्रवास सल्ला जारी केला होता, ज्यामध्ये उड्डाणांच्या संभाव्य अडचणींबाबत सूचना दिल्या होत्या.
दिल्लीतील प्रदूषण पातळी गंभीर स्तरावर आहे. सोशल मीडियात याचे अनेक व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. घनदाट धुके आणि प्रदूषित हवा यातून दिसते. दिल्लीतील अक्षरधाम येथील 493, बारापुल्ला फ्लायओव्हर - 433, बाराखंबा रोड- 474 एक्यूआय आहे.
दिल्ली आणि एनसीआर भागात कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट (सीएक्यूएम) ने ग्रेडेट अॅक्शन रिस्पॉन्स प्लॅन (जीआरएफ) चा चौथा टप्पा लागू करण्यात?आला?आहे. जो सर्वात कडक उपाय मानला जातो. त्यामध्ये दिल्लीत सर्व बांधकाम आणि विध्वंसक कामावर बंदी, सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होम, शाळा 11 पर्यंत (दहावी वगळून) हायब्रीड मोडमध्ये शिकवणी, या उपाययोजना तातडीने लागू केल्या आहेत.
इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांना विलंब करावा लागू शकतो तसेच विमानतळावर पोहोचायला विमानांना विलंब होऊ शकतो, याची जाणीव ठेवावी, असे सांगितले. आमची टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि सुरक्षिततेसह प्रवास सुनिश्चित करण्यासाठी काम करत आहे. एअर?इंडियानेही प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाईट स्टेटस तपासण्याचे आवाहन केले होते.