Delhi Ordinance Bill : दिल्लीसंदर्भातले वादग्रस्त विधेयक अखेर लोकसभेत मंजूर; गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी आघाडीचे काढले वाभाडे | पुढारी

Delhi Ordinance Bill : दिल्लीसंदर्भातले वादग्रस्त विधेयक अखेर लोकसभेत मंजूर; गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी आघाडीचे काढले वाभाडे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवर उपराज्यपालांचे नियंत्रण निश्चित करण्याबाबतचे राष्ट्रीय राजधानी दिल्ली सुधारणा विधेयक अखेर गुरुवारी (दि. ३) लोकसभेत वादळी चर्चेअंती मंजूर करण्यात आले. मागील काही काळापासून वादग्रस्त बनलेले हे विधेयक लोकसभेत सहजपणे मंजूर झाले असले तरी राज्यसभेत ते मंजूर करुन घेताना सरकारची कसोटी लागणार आहे. (Delhi Ordinance Bill)
दिल्लीकर नागरिकांचे हित लक्षात ठेवून केंद्राने हे विधेयक आणले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेच्या सुरुवातीलाच सांगितले. विरोधी पक्षांनी राजकीय लाभासाठी बनलेल्या नव्या विरोधी आघाडीकडे बघून नव्हे तर दिल्लीचे हित लक्षात घेऊन विरोधकावर आपले मत मांडावे असे सांगत शहा म्हणाले की, देशाचे संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल याच्या कसोटीवर हे विधेयक आणण्याचा केंद्राला पूर्ण अधिकार आहे. राजकीय लाभासाठी सारे विरोधक एकत्र आले आहेत, पण पुढील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआचा विजय पक्का आहे. (Delhi Ordinance Bill)
 गृहमंत्री शहा यांनी आम आदमी पक्षावर यावेळी हल्लाबोल केला. दक्षता खाते आपल्या नियंत्रणाखाली आणून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या बंगल्याच्या कामात झालेला घोटाळा लपवायचा आहे, असा आरोप शहा यांनी केला. जवाहरलाल नेहरू यांच्यासह सरदार वल्लभभाई पटेल, सी. राजगोपालाचारी, राजेंद्र प्रसाद आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हेही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या विरोधात होते, असे सांगत शहा पुढे म्हणाले की, वर्ष 2015 पर्यंत जेव्हा भाजप आणि काँग्रेस आलटून पालटून दिल्लीत सत्तेत यायचे, तोवर कोणताही वाद नव्हता. पण जेव्हापासून दिल्लीच्या सत्ताकारणात ‘आप’ पक्षाचा प्रवेश झाला आहे, तेव्हापासून सारी समस्या उद्भवली आहे. या लोकांना सकारात्मक काहीही करायचे नाही तर केवळ भांडणे करायची आहेत.

केजरीवाल तुम्हाला ‘बाय बाय’ करणार

सत्तेच्या स्वार्थासाठी संपुआची आघाडी झाली असून संसदेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आप नेते अरविंद केजरीवाल तुम्हाला बाय बाय करतील, असा टोला अमित शहा यांनी चर्चेला उत्तर देताना केला. संपुआतील घटक पक्षांचे नेते राज्या-राज्यामध्ये लढतात तर बंगळुरूमध्ये एकत्र येतात, असेही शहा म्हणाले.
काॅंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी गृहमंत्री शहा यांचे म्हणणे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. जेव्हा गरज भासते, तेव्हा तुम्ही जवाहरलाल नेहरु यांचे नाव घेता. जर खरोखर नेहरुंचे विचार अवलंबला असता तर आज मणिपूर आणि हरियाणामध्ये जी स्थिती आहे, ती दिसली नसती, असे चौधरी म्हणाले. शहा यांनी नेहरुंचा उल्लेख केल्याचा संदर्भ देत चौधरी म्हणाले की, आज गृहमंत्र्यांनी कसे काय नेहरूंचे नाव घेतले, याचे आश्चर्य वाटते. मला तर धावत जाऊन गृहमंत्र्यांच्या तोंडात मध साखर घालावेसे वाटत आहे. शहा यांनी त्यावर स्पष्टीकरण देताना मी नेहरूंचे कौतुक करीत नसून त्यांनी दिल्लीसंदर्भात कोणती मते व्यक्त केली होती, याची माहिती देत आहे, असे सांगितले.

दिल्लीकर नागरिकांच्या पाठीत खंजीर खुपसला : केजरीवाल

विधेयकावरील चर्चेत भाजपचे रमेश बिधुडी, मीनाक्षी लेखी, द्रमुकचे दयानिधी मारन, तृणमूलचे कल्याण बॅनर्जी, वाएसआर काॅंग्रेसचे मिथुन रेड्डी, शिवसेनेचे राहुल शेवाळे, बिजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा आदी सदस्यांनी सहभाग घेतला. दरम्यान विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्राने दिल्लीकर जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असे केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

सुशीलकुमार रिंकू यांचे निलंबन

दोन दिवसांपूर्वी लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिशेने कागद भिरकविणारे आम आदमी पक्षाचे जालंधर मतदार संघाचे खासदार सुशीलकुमार रिंकू यांचे उर्वरित कामकाजी दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. रिंकू यांच्या या कृत्यावर बिर्ला यांनी नाराजी दर्शवली होती.

मी घराणेशाहीचे प्रोडक्ट आहे, पण…सुप्रिया सुळे

भाजपाकडून आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला जातो. मला मान्य आहे की मी स्वतः घराणेशाहीचे प्रॉडक्ट आहे. मी प्रतिभा शरद पवार यांची मुलगी आहे याचा मला अभिमान आहे. पण मला भाजपाला एक प्रश्न विचारायचा आहे, घराणेशाहीचा मुद्दा तुम्ही उपस्थित करता, मग रालोआची बैठक होते तेव्हा जी. के. वासन, चिराग पासवान, प्रफुल पटेल, दुष्यंत चौटाला हे सगळे असतात. हे सगळे घराणेशाहीचे मेरिट सांगणारे नाहीत का? असा सवाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी चर्चेत सहभाग घेताना उपस्थित केला.

लोकसभा अध्यक्षांची नाराजी दूर

खासदारांकडून घातल्या जात असलेल्या गदारोळावर नाराज झालेल्या अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जोवर खासदारांचे वर्तन सुधारत नाही, तोवर सदनात येणार नाही, असा पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय खासदारांनी गुरुवारी बिर्ला यांची भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश आले आणि दुपारच्या कामकाजावेळी बिर्ला यांचे सदनात आगमन झाले. सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.
बिर्ला यांची नाराजी दूर करण्यासाठी ज्या खासदारांनी त्यांची भेट घेतली होती, त्यात काॅंग्रेसचे अधीर रंजन चौधरी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन, बसपाचे रितेश पांडे, भाजपचे राजेंद्र अग्रवाल, तृणमूलचे सौगत राय, नॅशनल काॅन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला आणि द्रमुकच्या कनिमोळी आदींचा समावेश होता. सभागृहातील शिस्त राखली जाईल, असे आश्वासन या नेत्यांकडून अध्यक्ष बिर्ला यांना देण्यात आले.

Back to top button