ड्रॅगनला रोखण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टर सज्ज | पुढारी

ड्रॅगनला रोखण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टर सज्ज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

चीनबरोबर दोन हात करण्यासाठी अमेरिकन बनावटीची अत्याधुनिक संरक्षण शस्त्रे भारतीय लष्कराने नुकतीच चीन सीमेवर तैनात केली आहेत. यामध्ये चिनूक हेलिकॉप्टर, अल्ट्रा लाईट टोड हॉवित्झर तोफा, रायफली या अमेरिकन शस्त्रसामग्रीबरोबर भारतीय बनावटीचे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आणि अल्ट्रामॉडर्न सर्व्हिलन्स सिस्टीम चीन सीमेवर तैनात केली असल्याची माहिती भारतीय लष्करी सूत्रांनी दिली.

माऊंटन स्ट्राईक कोअर टीम सक्रिय असून ड्रॅगनच्या कुरापतींना तोंड देण्यासाठी संरक्षण सज्जता बाळगली जात आहे. अरुणाचल प्रदेशातील चीन सीमेवरही भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात केली आहे. 1962 मध्ये चीनशी झालेल्या युद्धातील कमतरता भरून काढण्यासाठी आता खबरदारी घेतली जात असून गेल्या वर्षात सुमारे 30 हजारपेक्षा अधिक भारतीय सैन्य अरुणाचल सीमेवर तैनात केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भारतीय सैन्याला मजबूत, चपळ, सुरक्षित करण्यासाठी बूट, चिलखतींचा पुरवठा केला जात आहे. सैन्याला हवाई दलाशीही जोडले जात असल्याचे लष्कराचे माजी कमांडर लेफ्टनंट मनोज पांडे यांनी सांगितले. भारत आणि चीनमधील चर्चेची दिशा योग्य वळणावरून जात नसल्याने आणि चीननेही सीमेवर सैन्यांची जमवाजमव केल्याने अत्याधुनिक शस्त्रे सीमेवर तैनात करण्याशिवाय भारताकडे पर्याय नसल्याचे सेंटर फॉर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजी अँड टेक्नालॉजीचे निर्देशक राजेश्‍वर पिल्लई यांनी सांगितले. युद्ध झाल्यास भारताला कोणत्याही परिस्थितीत चीनला नमवायचे आहे. चीनने सीमेवर हालचाली वाढविल्याने भारताला सैन्यबळ मजबूत केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Back to top button