Kargil Vijay Divas 2023 : कारगिल युद्धादरम्यान राबवलेले ऑपरेशन ‘विजय, सफेद सागर आणि तलवार’ | पुढारी

Kargil Vijay Divas 2023 : कारगिल युद्धादरम्यान राबवलेले ऑपरेशन 'विजय, सफेद सागर आणि तलवार'

पुढारी ऑनलाइन डेस्क : Kargil Vijay Divas 2023 : पाकिस्तानने 1999 मध्ये कारगिल सीमारेषेचे उल्लंघन करून भारतीय सीमेत घुसखोरी केली. या घुसखोरीनंतर 19 मे रोजी भारताने अधिकृतरित्या युद्धाची घोषणा केली. या कारगिल युद्धात आपल्या जवानांच्या शौर्य-त्याग आणि बलिदानामुळे भारताने विजय मिळवला. पाकिस्तानच्या ताब्यात गेलेल्या सर्व चौक्यांवर पुन्हा ताबा मिळवला. पाकिस्तानी सैन्याला सीमापार खदेडून टाकले. आज 26 जुलै रोजी विजय मिळवल्यानंतर भारतीय सैन्याने युद्ध समाप्तीची घोषणा केली. या विजयाच्या स्मरणार्थ आणि जवानांच्या शौर्याच्या सन्मानात आपण ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करतो. या युद्धादरम्यान भारताने तीन मोठे ऑपरेशन्स राबवले. या ऑपरेशन्सचे नाव होते ऑपरेशन विजय, सफेद सागर आणि ऑपरेशन तलवार….जाणून घेऊ या ऑपरेशन्सबाबत

Kargil Vijay Divas 2023 : ऑपरेशन विजय

भारत सरकारने 19 मे 1999 रोजी युद्धाची अधिकृत घोषणा केली. तत्कालीन वाजपेयी सरकारने त्याला ऑपरेशन विजय असे नाव दिले. द्रास सेक्टरमधील आपल्या सीमेतील चौक्या ताब्यात घेण्यासाठी या ऑपरेशनची सुरुवात झाली. हे तसे खूप आव्हानात्मक होते. कारण आपले सैन्य खाली होते आणि पाकिस्तानी सैन्य हजारो फूट उंचीवर होते. त्यामुळे त्यांना आपल्या सैन्याला लक्ष्य करणे सहज शक्य होते. या उलट आपल्या सैन्याला प्रत्येक चौकीवर पोहोचण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचा मारा चुकवत एक एक कदम वर पोहोचायचे होते. मात्र, तरीही आपल्या शूरवीर सैन्याने आपल्या प्राणांचे बलिदान देऊन तोलोलिन पहाडी ते टायगर टेकडी पर्यंत आपल्या सर्व पोस्टवर पुन्हा ताबा मिळवला. भारताच्या बोफोर्स तोफांनी स्वतःच्या बळावर या युद्धात भारताला विजयाच्या दिशेने नेले.

Kargil Vijay Divas 2023 : ऑपरेशन सफेद सागर

भारताने या युद्धासाठी तीन्ही लष्कर, नौसेना आणि वायूसेना तिघांचाही सुयोग्य उपयोग केला. 19 मे 1999 रोजी ऑपरेशन विजय सुरू केल्यानंतर थोड्याच दिवसांनी भारताने 26 मे 1999 रोजी ऑपरेशन सफेद सागर ची सुरुवात केली. या ऑपरेशन दरम्यान भारताला आपले काही लढाऊ विमान गमवावे लागले. तसेच काही शहीद झाले तर काहींना पाकिस्तानने युद्धबंदी देखील केले. 27 मे रोजी भारतीय लढाऊ विमानांना पाकिस्तानी सैन्याने खाली पाडले. यावेळी फ्लाइट लेफ्टिनंट नचिकेता यांना पाकिस्तानने युद्धबंदी बनवले. त्याचवेळी स्वॉड्रन लीडर अजय अहुजा शहीद झाले. या नंतर भारताने आपली रणनीति बदलली.

भारताने आपल्या लढाऊ विमानांऐवजी हेलीकॉप्टर वापरण्याचा निर्णय घेतला. भारतीय हेलिकॉप्टरने पाकिस्तानी चौक्यांवर निशाणा साधला. या दरम्यान एक हेलिकॉप्टर भारताला गमवावा लागला. त्यानंतर भारताने मिराज विमानांना मोर्चा सांभाळायला पाठवले. यावेळी मात्र, पाकिस्तानी सैन्याची कंबर मोडली. मिराजपुढे पाकिस्तानी सैन्याची चांगलीच पिछेहाट झाली.

नौ सेनेचे ऑपरेशन तलवार

ऑपरेशन सफेद सागर याच्यासोबतच भारताने नौ दलाचे ऑपरेशन तलवार राबवण्यास सुरुवात केली. त्याअंतर्गत वेस्टर्न नेवल कमांड आणि साऊदर्न नेवल कमांडने अरबी समुद्रात पाकिस्तानला नेवल ब्लॉकेज तयार केले. परिणामी पाकिस्तानात पेट्रोलियमचा पुरवठा बंद झाला. त्यामुळे पाकिस्तानात फक्त सहा दिवसांपूरतेच पेट्रोलियम शिल्लक राहिले होते. अखेर पाकिस्तान सर्व बाजूंनी घेरला गेला आणि त्याने मदतीसाठी अमेरिका आणि चीन समोर हात पसारले.

Kargil Vijay Divas 2023 : इंटरसेप्टने पाकिस्तानला जगासमोर उघडे पाडले

पाकिस्तान जेव्हा अमेरिका आणि चीनकडून मदत मागत होता. त्याच वेळी मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे सैन्य भारतीय भागात घुसले आहे हे मान्य केले होते. मुशर्रफने स्वीकारलेली ही बाब भारताने इंटरसेप्टच्या माध्यमातून सार्वजनिक केली. परिणामी पाकिस्तान आख्ख्या जगासमोर उघडा पडला. त्यानंतर पाकिस्तानला भारतासमोर शरणांगती पत्करावी लागली. 14 जुलैला भारताने ऑपरेशन्सच्या सफलतेची घोषणा केली. तर 26 जुलैला प्रत्येक चौकीला पाकिस्तानच्या ताब्यातून पुन्हा घेतल्यानंतर 26 जुलै रोजी भारतीय सैन्याने युद्ध समाप्तीची घोषणा केली.

हे ही वाचा :

कारगिल विजय दिवस : पंतप्रधानांसह मान्यवरांची शहिदांना आदरांजली

डॉ. प्रतापसिंह जाधव यांना राष्ट्रीय कारगिल गौरव पुरस्कार

Back to top button