पुढारी ऑनलाइन डेस्क : Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात भारताने विजय मिळवून आज 26 जुलै रोजी 24 वर्ष पूर्ण होत आहेत. 1999 मध्ये पाकिस्तानने मैत्रीचा हात पुढे करत पाठीत खंजीर खुपसला. कारगिलमध्ये सैन्याला घुसवून भारतावर हल्ला केला. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत लाहोर करार करून पाकिस्तान मैत्रीची सुरुवात करू इच्छितो असे भासवले. त्याचवेळी शिमला करार मोडून पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कारगिलमध्ये सैन्य घुसवून युद्धाची तयारी केली. मात्र, पाकिस्तानचा हा डाव उघडला आणि नंतर भारतीय सैन्याने शौर्य गाजवत पाकिस्तानला शरण येण्यास भाग पाडले. आज 26 जुलै रोजी भारताने कारगिल ऑपरेशन विजय मोहीम पूर्ण केली. त्याच्याच स्मरणार्थ 26 जुलै हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. जाणून घेऊया कारगिल युद्धाचा पाकिस्तानचा डाव कसा उघडला…
भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही राष्ट्र मे 1998 मध्ये परमाणू शक्ती संपन्न राष्ट्र बनले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रांमधील तणाव वाढला. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी वाजपेयी यांनी लाहोरपर्यंत बस यात्रा केली. 21 फेब्रुवारी 1999 मध्ये दोन्ही राष्ट्रांनी सर्व मुद्द्यांवर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील असा लाहोर करार करण्यात आला. मात्र, अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी एकीकडे मैत्रीचा करार करून दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने वेगळाच डाव रचला होता.
भारत-पाकिस्तान शिमला करारानंतर भारत आणि पाकिस्तानच्या कारगिल सीमेवर थंडीमध्ये 30-40 अंश सेल्सिअस तापमान ऋण असते. त्यामुळे ऑक्टोबर नंतर दोन्ही देशांच्या चौक्यांवरील सैनिक आपआपल्या पोस्ट सोडून मागे जातात. आणि मे किंवा जूनमध्ये पुन्हा चौक्यांवर ताबा घेतात. याच गोष्टीचा फायदा उचलत पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी 'ऑपरेशन बद्र'चा कट रचला.
एकीकडे शरीफ भारत पाकिस्तान मैत्रिचे नवे पर्व रचत आहे, असे भासवत होते. तर दुसरीकडे मुशर्रफ यांनी प्रथम कारगिल चौक्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यामार्गे लेह-श्रीनगर हायवे वर कब्जा करून नंतर सियाचिनचा ताबा घेणे हा डाव होता. यासाठी 1998 च्या ऑक्टोबरमध्ये भारतीय सैन्य माघारी फिरले. मात्र, पाकिस्तानने फक्त चौक्या सोडण्याचे नाटक केले. प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानच्या सैन्याने चौक्या खाली केल्याच नाहीत.
भारतीय सैनिक आपल्या चौक्या सोडून परत आले त्यानंतर छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी करून हळूहळू करून एकएक चौकीवर ताबा मिळवला. परिणामी नंतर युद्धादरम्यान अशी परिस्थिती उद्भवली की भारतीय सैन्य खालच्या भागात होते. तर पाकिस्तानी सैन्य 18 हजार फूट उंचीवर वरच्या बाजूला होते. त्यामुळे ही लढाई अत्यंत कठीण बनली होती.
मे 1999 मध्ये तेथील स्थानिक ताशी नामग्याल या तेथील याकपालन करणाऱ्या व्यक्तीचा नवीन याक हरवला होता. त्यामुळे हा नामग्याल आपला याक शोधण्यासाठी निघाला. कुठेही याक सापडला नाही म्हणून त्याने तेथील उंच-उंच डोंगर चढून आपल्या याकचा शोध घेतला. हा शोध घेताना अखेर त्याला त्याचा याक दिसला. मात्र, त्याने पाकिस्तानी सैन्य आणि अन्य बरीच दृश्ये पाहिली. तीच घटना तेथील अन्य स्थानिकांनी देखील या घटना पाहिल्या. त्यांनी याची माहिती भारतीय सैन्याला दिली.
भारतीय सैन्याला ही माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला भारतीय सैन्याने एका तुकडीला पाठविले. मात्र, या तुकडीतील पाचही जवान शहीद झाले. याशिवाय पाकिस्तानी लष्कराने कारवाईसाठी गेलेले एक भारतीय विमान देखील पाडले. त्यानंतर कारगिलमध्ये अधिकृत युद्धाची घोषणा करण्यात आली. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी याला ऑपरेशन विजय असे नाव दिले. ही लढाई आपल्या सैन्यासाठी खूपच अवघड होती. मात्र, भारतीय सैन्याने करून दाखवले. आपल्या शूरवीर भारतीय सैन्याने आपल्या प्रत्येक चौकीवर ताबा मिळवला. तोलोलिन पहाडी ते टायगर हिल प्रत्येक पोस्टवर ताबा पुन्हा मिळवत पाकिस्तानी सैन्याला खदेडून बाहेर सोडले. 26 जुलैला भारतीय सैन्याने युद्ध समाप्तीची घोषणा केली.
हे ही वाचा :