पाच वर्षांत १३.५ कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले; नीती आयोगाचा अहवाल | Niti Aayog | पुढारी

पाच वर्षांत १३.५ कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले; नीती आयोगाचा अहवाल | Niti Aayog

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : वर्ष 2015-16 ते 2019-20 या पाच वर्षांच्या कालावधीत साडेतेरा कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले असल्याची माहिती नीती आयोगाने (Niti Aayog) आपल्या एका अहवालात दिली आहे. ‘नॅशनल मल्टी डायमेन्शनल पुव्हर्टी इंडेक्स: ए प्रोग्रेस रिव्ह्यू’ (National Multidimensional Poverty Index: A Progress Review) या नावाने हा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.

वर्ष 2015-16 मध्ये बहुआयामी (Multi Dimensional) गरिबी रेषेखाली राहत असलेल्या लोकांची संख्या 24.85 टक्के इतकी होती. त्यानंतर पाच वर्षांत ही संख्या 9.89 टक्क्याने घटून 14.96 टक्क्यांवर आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. गरिबी रेषेतून बाहेर येणारे सर्वाधिक लोक उत्तर प्रदेशातले आहेत. त्याखालोखाल बिहार, मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. याशिवाय ओडिशा आणि राजस्थान या राज्यांतील गरिबी लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे.

ग्रामीण भागाचा विचार केला तर पाच वर्षांपूर्वी गरिबी रेषेखाली राहणाऱ्या लोकांची संख्या 32.59 टक्के इतकी होती. ती घटून 2019-20 मध्ये 19.28 टक्क्यांवर आली आहे. पोषण, बाल आणि किशोर मृत्यू दर, मातृ आरोग्य, शाळकरी मुलांचे शिक्षण वर्ष, शाळांमधील उपस्थिती, घरगुती इंधन, स्वच्छता, पिण्याचे पाणी, निवास, परिसंपत्ती आणि बॅंक खाती आदी निकषांचा अभ्यास करुन हा अहवाल बनविण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान जनधन योजना, सौभाग्य, समग्र शिक्षण आदी योजनांचा बहुआयामी गरिबी दूर करण्यात मोठा हातभार लागला  असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

Back to top button