Drugs Seized | ९ वर्षांमध्ये २२ हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची माहिती | पुढारी

Drugs Seized | ९ वर्षांमध्ये २२ हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची माहिती

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात गेल्या ९ वर्षांमध्ये २२ हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत,अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी यांनी दिली. २००६ ते २०१३ दरम्यान ७६८ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.तर, २०१४ ते २०२२ दरम्यान अंमली पदार्थांच्या जप्तीत ३० पटींने वाढ नोंदवत ती २२ हजार कोटींपर्यंत पोहचल्याचे शहा म्हणाले.अंमली पदार्थ विरोधात व्यापक आणि समन्वयातून लढण्यात येत असलेल्या लढाईचा हा प्रभाव असल्याचे ते म्हणाले.अंमली पदार्थाचा व्यापार करणार्यांविरोधात २००६ ते २०१३ च्या तुलनेत २०१४ ते २०२२ दरम्यान १८१ टक्क्यांनी अधिक गुन्हे दाखल करण्यात आल्याचे शहा म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार देशातून अंमली पदार्थांची समस्येचे समूळ नायनाट करण्यास कटिबद्ध आहे. देशातून अंमली पदार्थांची तस्करी होवू दिली जाणार नाही,असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.अंमली पदार्थांचा दुरूपयोग आणि अवैध तस्करी विरोधात आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त शहा यांनी व्हिडिओ संदेश जारी केला.गृह मंत्रालयाने अंमली पदार्था विरोधात शून्य सहनशीलता धोरण अवलंबले असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे शहा यांनी त्यांच्या संदेशातून स्पष्ट केले.

सामूहिक प्रयत्नातून अंमली पदार्थांचा समूळ नायनाट करण्यात यशस्वी होवू. ही लढाईत विजयश्री मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही,अशी ग्वाही त्यांनी यानिमित्त दिली.जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा पुनर्वापर रोखण्यासाठी जून २०२२ मध्ये त्यांना नष्ट करण्याचे अभियान राबवण्यात आले.देशभरातील ६ लाख किलोग्राम जप्त करण्यात आलेले अंमली पदार्थांना यादरम्यान नष्ट करण्यात आले आहे.यावरून अंमली पदार्थ मुक्त भारतासाठीची मोदी सरकारची कटिबद्धता दिसून येते.विविध विभागांच्या समन्वयाने प्रभावी धोरण आखले जात आहेत,असे शहा म्हणाले.

अंमली पदार्था विरोधात सर्व प्रमुख एजन्सींनी विशेषत: एनसीबी प्रामुख्याने कार्यरत आहे. यादरम्यान शहा यांनी सर्व देशवासियांना आपल्या कुटुंबियांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचे आव्हान केले.अंमली पदार्थ तरुण पिढी आणि समाजाला उध्वस्त करीत आहे. शिवाय यातून कमावण्यात आलेला पैसा देशविरोधी कारवायात वापरला जात असल्याचे शहा म्हणाले.

Back to top button