Mini Tajmahal : मुलाचे असेही प्रेम; आईच्या स्मरणात त्याने उभारला ‘मिनी ताजमहाल’! | पुढारी

Mini Tajmahal : मुलाचे असेही प्रेम; आईच्या स्मरणात त्याने उभारला 'मिनी ताजमहाल'!

पुढारी ऑनलाइन डेस्क : Mini Tajmahal : मुघल बादशाह शाहजहानने प्रिय पत्नी ‘मुमताज उल झमानी’ हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बनवला होता. हे ताजमहाल आज जागतिक वारसास्थळ तसेच जागतिक सप्ताश्चर्यांपैकी एक आहे. मात्र, इथे एक असा अवलिया आहे. ज्याने आपल्या आईच्या स्मरणात स्वतःच्या खर्चातून मिनी ताजमहाल उभा केला आहे. आज ते आई आणि मुलाच्या सुंदर नात्याचे आणि प्रेमाचे प्रतिक म्हणून परिसरात प्रसिद्ध होत आहे. या मिनी ताजमहालला भेट देण्यासाठी अनेक लोक येत आहेत.

Mini Tajmahal : चेन्नईतील व्यावसायिकाने आईच्या प्रेमात बनवला ताजमहाल

अमरुद्दीन शेख दाऊद साहिब असे मिनी ताजमहाल बनवणाऱ्याचे नाव आहे. हा चेन्नईतील एक व्यावसायिक आहे. त्याच्या आईचे नाव जैलानी शेख असे होते. 2020 जैलानी यांचे निधन झाले. त्यानंतर आपल्या आईच्या आठवणीत त्यांनी हा मिनी ताजमहाल उभारला.
अमरुद्दीन शेख हे चेन्नईतील एक हार्डवेअर व्यापारी आहेत. तमिळनाडूमधील तिरुवरूर हे त्यांचे मूळ गाव. अमरुद्दीन यांचे बालपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत गेले आहे. पाच भावंडांमध्ये अमरुद्दीन एकूलता एक मुलगा होता. तर बाकी चारही बहिणी होत्या. अमरुद्दीनचे वडील अब्दुल याची चेन्नईत लेदर प्रोडक्ट्सची छोटी फर्म होती. मात्र, मुलं लहान असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा त्यांची पत्नी जैलानी हिने मोठ्या कष्टाने आपल्या सर्व मुलांचे पालन पोषण केले.

Mini Tajmahal : एकूलता एक मुलगा असल्याने आईसोबतचं नातं खूपच घट्ट

अमरुद्दीन एकूलता एक मुलगा असल्याने त्यांनी देखील लहानपणापासूनच आपल्या आईसोबत काम करायला सुरुवात केली होती. त्यामुळे ते आईच्या खूप जवळ होते. सोबतच त्यांनी शिक्षण घेऊन ते हार्डवेअरचे व्यापारी झाले. दरम्यान, 2020 मध्ये त्यांच्या आईचे एका अमावस्येला निधन झाले. त्यामुळे आईच्या आठवणीत ते दर अमावस्येला 1000 लोकांना बिर्याणी खाऊ घालत असे.

मात्र, नंतर त्यांना असे वाटले आईच्या आठवणीत फक्त बिर्याणीच दान करत आहोत. हे खूप अपुरे आहे. आपण आणखी काही तरी करायला हवे. तेव्हा त्यांना लघु ताजमहाल बनवण्याची संकल्पना सुचली. अम्मयप्पन या त्यांच्या वडिलांच्या मूळ गावी त्यांनी एक एकर जमिनीचा भूखंड खरेदी केला. नंतर आपल्या बांधकाम व्यावसायिक असलेल्या मित्राच्या मदतीने स्मारकाचे काम सुरू केले.

Mini Tajmahal : 2 जूनपासून हे स्मारक लोकांसाठी खुले

ताजमहाल बनवण्यासाठी त्याने राजस्थानातून संगमरवर खरेदी केले. ताजमहालप्रमाणेच त्याच्या सभोवतालचे मार्ग आणि पदपथ बांधले. अमरुद्दीन याने हुबेहुब ताजमहालाची प्रतिकृती उभारली. यात त्यांने मदरसे देखील बांधले. येथे 10 विद्यार्थी राहतात. तसेच सर्व धर्मीयांसाठी एक ध्यान केंद्र आहे. हे मिनी ताजमहाल बांधण्यासाठी त्याला 5 कोटी रुपयांचा खर्च आला. संपूर्ण बांधकाम झाल्यानंतर गेल्या 2 जून 2023 रोजी त्यांनी हे स्मारक लोकांना पाहण्यासाठी खुले केले आहे. मात्र, अमरुद्दीन असे सांगतात की याबाबत त्यांनी फारसा प्रचार केला नाही. लोकांना तोंडी माहितीतूनच याबाबत समजले.

हे ही वाचा :

Covid Restrictions : ताजमहालला येणाऱ्या पर्यटकांसाठी कोरोना चाचणी सक्तीची

ताजमहाल संबंधी ‘ती’ याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Back to top button