The Kerala Story : प्रेक्षकांअभावी 'दि केरला स्टोरी'चे प्रदर्शन बंद; तामिळनाडू सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र | पुढारी

The Kerala Story : प्रेक्षकांअभावी 'दि केरला स्टोरी'चे प्रदर्शन बंद; तामिळनाडू सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात सध्या ‘दि केरला स्टोरी’वरून वातावरण तापले आहे.हा चित्रपट म्हणजे प्रचारतंत्र आहे,असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशात तामिळनाडू सरकारने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्याचा आरोप करीत चित्रपट निर्मात्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.मंगळवारी यासंदर्भात राज्य सरकार ने प्रतिज्ञापत्र सादर केले.पंरतु, प्रेक्षकांअभाव या चित्रपटाचे प्रदर्शन बंद करण्यात आले, असे उत्तर सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून दिले. (The Kerala Story )
प्रेक्षकांकडून मिळालेल्या खराब प्रतिक्रियेमुळे चित्रपट गृहात चित्रपटाचे प्रदर्शन बंद करण्यात आले.चित्रपट निर्मात्यांकडून मुद्दाम भ्रामक माहिती पसरवणारे वक्तव्य करण्यात आली.राज्य सरकारने चित्रपटाच्या स्क्रीनिंगवर बंदी घातल्याचे खोट सांगत दिशाभूल करण्यात आल्याचा दावा देखील सरकारने प्रतिज्ञापत्रातून सर्वोच्च न्यायालयात केला.प्रेक्षकांमुळे चित्रपट मालकांनी स्वत:हून चित्रपटाचे स्क्रीनिंग रोखले.सरकार चित्रपटगृहांना सुरक्षा प्रदान करण्याव्यतिरिक्त प्रेक्षकांना संरक्षण देण्यासाठी काही करू शकत नाही.यापूर्वी न्यायालयाने राज्य सरकारला चित्रपट निर्मात्यांच्या याचिकेवरून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते.राज्याने चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घातल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता.चित्रपटाला प्रेक्षक मिळत नसल्यामुळे चित्रपट मालकांनी ७ मे रोजी चित्रपटाचे स्क्रीनिंग बंद केले होते.

राज्यातील १९ मल्टीप्लेक्स मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.पंरतु, राज्याने चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातल्याचा कुठलाही पुरावा चित्रपट निर्मात्यांकडे नाही, असा दावा देखील राज्य सरकारने केला.ज्या ठिकाणी चित्रपट प्रदर्शित करण्यात आला त्या ठिकाणी प्रेक्षकांना कुठल्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,असे देखील तामिळनाडू सरकारने न्यायालयात सांगितले.

Back to top button