New FM Radio Transmitters : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८४ जिल्ह्यातील ९१ एफएम रेडिओ ट्रान्समीटरचे उद्घाटन | पुढारी

New FM Radio Transmitters : पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८४ जिल्ह्यातील ९१ एफएम रेडिओ ट्रान्समीटरचे उद्घाटन

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील 18 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 84 जिल्ह्यातील 91 एफएम रेडिओ ट्रान्समीटरचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी केले जाणार आहे. मागास, महत्त्वाकांक्षी तसेच सीमाभागात असलेल्या जिल्ह्यातील रेडिओ संपर्क यामुळे वाढण्याचा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला आहे.
सरकारच्या या मोहिमेमुळे दोन कोटी लोकांपर्यंत रेडिओ सेवा पोहोचणार आहे. याशिवाय 35 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात आकाशवाणीचा विस्तार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाचे प्रसारण येत्या रविवारी होत आहे. त्याच्या दोन दिवस आधी हा विस्तार होणार आहे, हे विशेष.
ज्या ठिकाणी एफएम रेडिओ केंद्रे स्थापन केली जाणार आहे, त्यात बिहार, झारखंड, ओडिशा, प. बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगण, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ही राज्ये तसेच लडाख व अंदमान – निकोबार केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे.

Back to top button